मुंबईः महाराष्ट्रातल्या राजकारणाची लढाई आता सर्वोच्च न्यायालयात लढली जात आहे. सर्वोच्च न्यायालय महाराष्ट्राच्या राजकीय भवितव्याचा निर्णय घेणार आहे. कायद्याचं युद्ध जिंकण्यासाठी राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेनं कंबर कसली असतानाच अजित पवारांच्या ट्विटनंतर राष्ट्रवादीमध्ये खळबळ उडाली आहे. खबरदारीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीनं आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं असून, ते सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. मुंबईतल्या रेनसाँ हॉटेलमध्ये रविवारी दिवसभर अनेक घडामोडी घडत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांचं या हॉटेलमध्ये येणं-जाणं होतं. राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार स्वतः हॉटेलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या आमदारांसोबत बातचीत केली. या हॉटेलमध्ये एनसीपीचे किती आमदार आहेत याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. परंतु राष्ट्रवादीला आमदार फुटण्याची भीती सतावू लागली आहे. त्यामुळे संध्याकाळी राष्ट्रवादीनं आमदारांना हॉटेल रेनसाँमधून हयातमध्ये हलवलं. रात्री दहा वाजताच्या दरम्यान एनसीपीचे सर्व आमदारांना हयात हॉटेलमध्ये हलवण्यात आलं. रेनसाँ हॉटेलमधून हयात हॉटेलमध्ये शिफ्ट करण्यापूर्वी तिथे उपस्थिती असलेल्या सर्वच आमदारांकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं आहे. ही प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर करण्यात येणार आहेत. परंतु या प्रतिज्ञापत्रात नक्की काय लिहिलं आहे, याची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही.
राष्ट्रवादीला सतावतेय हेरगिरीची भीतीराष्ट्रवादीला आपल्या आमदाराच्या हेरगिरीची भीती सतावते आहे. राष्ट्रवादीचे आमदार थांबलेल्या रेनसाँ हॉटेलमध्ये साध्या वेषात पोलीस कर्मचारी फिरत असल्याचं पाहायला मिळालं आहे. त्याचदरम्यान राष्ट्रवादीचे नेते आणि पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचंही समोर आलं आहे. त्यानंतर राष्ट्रवादीनं सर्व आमदारांना हयात हॉटेलमध्ये हलवलं आहे.