यदु जोशी, मुंबईआघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या जलसंपदा विभागातील कोट्यवधी रुपयांचे घोटाळे अखेर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) रडारवर आले आहेत. कारवाईची सुरुवात कोकणातील प्रकल्पांमध्ये झालेल्या घोटाळ्यांसंदर्भातील कारवाईने होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. आघाडी सरकारच्या काळात केवळ सार्वजनिक बांधकाम खात्यातील घोटाळ्यांसंदर्भात आणि तेही तत्कालिन मंत्री छगन भुजबळ यांना टार्गेट करणारीच कारवाई होत असून जलसंपदा विभागाला मोकळे सोडले जात आहे, अशी टीका देवेंद्र फडणवीस सरकारवर झाली होती. या टीकेला प्रत्युत्तर देणारी जोरदार कारवाई आता होऊ घातली आहे. विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की रायगडमधील बाळगंगा प्रकल्पातील घोटाळ्यांसंदर्भात जलसंपदा विभागाचे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यावर गुन्हे दाखल करण्याची कारवाई कुठल्याही क्षणी केली जाऊ शकते. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी कृष्णा खोरे सिंचन महामंडळाच्या अखत्यारित कोकणात हाती घेतलेल्या १३ सिंचन प्रकल्पांमध्ये मोठे घोटाळे झाल्याची याचिका उच्च न्यायालयात दाखल केली होती. या प्रकल्पांच्या कामांची चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्यानुसार एसीबीने चौकशी पूर्ण करून आता गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.
अखेर जलसंपदातील घोटाळ्यांवर कारवाईचा बडगा
By admin | Published: August 20, 2015 12:54 AM