यातचं सगळ आलं, पवार-शहा भेटीवर भाजपने अधिकृत भूमिका मांडली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2021 01:31 PM2021-03-29T13:31:52+5:302021-03-29T13:32:26+5:30
एकत्र येणे, भेटणे ही आपली संस्कृती असून अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे, शरद पवारांनी त्यांची भेट घेतली असेल. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्या का, यासंदर्भात माहिती नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.
मुंबई - मुंबई - केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तसेच राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यात अहमदाबादमध्ये गुप्त भेट झाल्याची चर्चा रविवारी दिवसभर राजकीय वर्तुळात रंगली होती. मात्र, अशी कोणतीही भेट झालीच नसल्याचे राष्ट्रवादीने स्पष्ट केले आहे. एका गुजराती वर्तमानपत्राने या तिघांमध्ये अहमदाबादमधील फार्म हाऊसवर गुप्त भेट झाल्याचे वृत्त दिले होते. (That meeting did not take place, only the Pawar-Shah meeting was discussed, even the NCP denied it) त्यानंतर, राज्याच्या राजकारणात अनेक चर्चा रंगल्या. भाजपा-राष्ट्रावादी पुन्हा म्हणणार का, अशीही चर्चा रंगली. यासंदर्भात भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपलं मत मांडलं आहे.
एकत्र येणे, भेटणे ही आपली संस्कृती असून अमित शहा देशाचे गृहमंत्री आहेत. त्यामुळे, शरद पवारांनी त्यांची भेट घेतली असेल. मात्र, या भेटीत राजकीय चर्चा झाल्या का, यासंदर्भात माहिती नाही, असे भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय. तर, खासदार संजय राऊत यांना हे सरकार टिकेल, असं वारंवार सांगावं लागतंय यातच सगळं आलं. अमित शहा आणि शरद पवार यांची भेट झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांना सरकार टिकेल, असे सांगावे लागते म्हणजे काहीतरी गडबड आहे, असा टोलाही पाटील यांनी लगावला. भाजपा-राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाबाबत अनेकांचे अंदाज असतात, पण पुन्हा एकत्र येण्यासारखं नाही, असं स्पष्टीकरणही त्यांनी दिल.
चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात पोलीस आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर, पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी पवार-शहा भेटीवर मत मांडलं. तसेच, पोलीस आयुक्तांची दोन कारणांसाठी भेट घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. कॉलनीच्या गोसावी वस्तीतील लोकांना त्रास होत होता, त्यासाठी तिकडे एक पोलीस चौकी व्हावी ही मागणी केली आहे. तर, कोरोनाच्या वाढत्या प्रमाणाला लॉकडाउन हा पर्याय नाही, यासंदर्भातही भेट होती, असे त्यांनी सांगितले.
लॉकडाऊन पर्याय नाही
नाईट संचारबंदी ठीक आहे, लॉकडाऊननंतर लोकांनी व्यवहार सुरू केले आहेत. त्यामुळे, आम्ही लॉकडाऊनला कडाडून विरोध करू, तसेच व्यापारी आणि इतर सामान्य लोकही लॉकडाऊनचा विरोध करणार आहेत. लॉकडाऊन हा उपाय नसून टेस्टिंग सेंटर वाढवा, संसर्गजन्य रोग आहे हे मान्य, हे सर्व करून घरी बसा हे शक्य नाही, असेही पाटील म्हणाले.
शरद पवार यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना
शरद पवार आजारी असल्यासंदर्भात मलाही नवाब भाईंकडूनच समजलं. महाराष्ट्राची कुलस्वामीनी आई तुळजाभवानीला प्रार्थना करेन की, त्यांना लवकर आराम मिळू दे, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
संजय राऊत यांची भूमिका
शरद पवार आणि अमित शहा यांची भेट झाली असली तरी त्यात गैर काय आहे, आम्हीही भेटू शकतो अमित शहांना. कारण, ते देशाचे गृहमंत्री आहेत. अमित शहा म्हणाले अशा बातम्या सार्वजनिक करता येत नाहीत. पण, गुप्त काहीच राहत नसतं, बंद खोलीतील चर्चाही गुप्त राहत नाही, सार्वजनिक होतात, असे संजय राऊत यांनी म्हटलं. तसेच, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या टीकेसंदर्भातही संजय राऊत यांनी स्पष्टीकरण दिलं. देशात महाराष्ट्राचं नाव खराब झालंय, या घटनांवरुन सध्या महाराष्ट्र बदनाम झालाय, जे व्हायला नको. महाराष्ट्राला देशात एक वेगळीच प्रतिष्ठा आहे.
वैयक्तिक टीकेचा उद्देश नव्हता
माझं कुणावरही वैयक्तिक टीका करण्याचा उद्देश नव्हता. सरकारमधील मुख्यमंत्री, गृहमंत्री यांचं काम उत्तम सुरू आहे. फक्त, विरोधकांकडून जे वातावरण निर्माण केलं जातंय, ते करुन देण्याची संधी विरोधकांना देऊ नये, हेच मला सांगायचं होतं, असे रोखठोक स्पष्टीकरण राऊत यांनी दिलंय. तसेच, महाविकास आघाडी सरकार स्थिर असून पुढील साडेतीन वर्षे विरोधकांनी आमच्यासोबत प्रेमाचे रंग उधळावेत, असा टोलाही राऊत यांनी विरोधकांना लगावला.