अखेर वाढीव बेट प्रकाशाने उजळले
By admin | Published: July 17, 2014 01:36 AM2014-07-17T01:36:44+5:302014-07-17T01:36:44+5:30
पश्चिम रेल्वेच्या सफाळे-वैतरणा रेल्वेस्टेशन दरम्यान वाहणाऱ्या वैतरणा खाडीत वसलेल्या वाढीव बेटावरील रहिवासी विद्युत पुरवठा खंडित
पालघर : पश्चिम रेल्वेच्या सफाळे-वैतरणा रेल्वेस्टेशन दरम्यान वाहणाऱ्या वैतरणा खाडीत वसलेल्या वाढीव बेटावरील रहिवासी विद्युत पुरवठा खंडित झाल्याने तीन दिवसांपासून काळोखात राहत असल्याचे वृत्त लोकमतने (१४जुलै) प्रसिध्द करताच हयगय करणाऱ्या विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्याने याची तात्काळ दखल घेतली. काल संध्याकाळी नादुरूस्त ट्रान्सफॉर्मर बदलून त्या जागी नवीन ट्रान्सफार्मर लावल्यानंतर वाढीव बेट पुन्हा प्रकाशाने उजळले.
पालघर व वसई तालुक्याच्या सिमेवर उत्तर वैतरणा खाडीच्या मध्यभागी वसलेल्या वाढीव बेटावरील २ हजार २०० ग्रामस्थांना मागील १५-२० वर्षांपासून सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत जगण्यासाठी रोजच जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे. शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी या जगण्यासाठीच्या लागणाऱ्या महत्वपूर्ण त्रिसूत्रीकडेही शासनपातळीवरून अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याने हे बेट विकासापासून कोसो दूर आहे. पिण्याच्या पाण्यासाठी १७ गावे करवाळे योजनेतून पाणीपुरवठा करणारी पाईप लाईन रेल्वे गाड्यांच्या हादऱ्यामुळे नादुरूस्त होत असल्याने महिलांना वैतरणा स्टेशन ते सफाळे स्टेशन असा रेल्वे ट्रॅकमधून डोक्यावर हंडे घेत पाणी आणावे लागते. यामध्ये अनेक महिलांचा रेल्वेखाली सापडून अपघातात बळी गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तर शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी विरार-पालघरकडे जावे लागते. आरोग्याबाबत तर ग्रामस्थांसह महिलांची मोठी हेळसांड होत असून सफाळे प्राथमिक आरोग्य केंद्रांर्गत वाढीवमध्ये असलेल्या उपकेंद्रात आठवड्याभरातून कधीतरी नर्स येत असून डॉक्टर आल्याचे आठवत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.