Join us  

अखेर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या विद्यार्थिनींना दिलासा; हॉस्टेलची सुविधा पुरविण्यास मुंबई विद्यापीठ तयार 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2024 9:35 AM

स्वायत्त दर्जा मिळालेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील ४० विद्यार्थिनींना हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची तयारी मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने दाखविली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : स्वायत्त दर्जा मिळालेल्या जे. जे. स्कूल ऑफ आर्टमधील ४० विद्यार्थिनींना हॉस्टेलची सुविधा पुरविण्याची तयारी मुंबई विद्यापीठाच्या प्रशासनाने दाखविली आहे. मात्र, हॉस्टेलसाठी विद्यापीठाकडून यावर्षी प्रथमच राबविली जाणारी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत तरी त्यांना हॉटेल किंवा नातेवाइकांच्या आश्रयाला राहावे लागणार आहे. मुंबई विद्यापीठाने जे.जे. ला स्वायत्तता मिळाल्याचे कारण आपल्या मादाम कामा गर्ल हॉस्टेलमध्ये संस्थेच्या विद्यार्थिनींना प्रवेश नाकारला होता. 

इथल्या अनेक मुली मराठवाडा, विदर्भातील असून, गेली दोन-तीन वर्षे जेजेमध्ये विविध कला शाखांमध्ये शिक्षण घेत आहेत. वर्षानुवर्षे संस्थेतील विद्यार्थिनी या हॉस्टेलमध्ये राहत आल्या आहेत. मात्र, कॉलेज सुरू झाले तरी हॉस्टेलमध्ये जागा न मिळाल्याने गेले १५ दिवस विद्यार्थिनी मुंबईत हॉटेल आणि नातेवाइकांच्या घरी आश्रयाला आहेत. हॉस्टेलच्या अधीक्षकांपासून ते मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंपर्यंत अर्ज-विनंत्या केल्यानंतर आता कुठे विद्यापीठ प्रशासनाने त्यांना हॉस्टेलमध्ये जागा देण्याचे मान्य केले आहे. मात्र, त्यासाठी त्यांना आणखी आठवडाभर तरी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया मुंबई विद्यापीठाकडून यंदापासून सर्वच हॉस्टेलमधील प्रवेश प्रक्रिया समर्थ पोर्टलच्या माध्यमातून ऑनलाइन राबविली जाणार आहे. विद्यार्थ्यांचे अर्ज आल्यानंतर विद्यापीठाची समिती विद्यार्थ्यांना हॉस्टेलच्या जागांचे वाटप करील. ही प्रक्रिया साधारण आठवडाभर चालणार चालेल. त्यानंतर या विद्यार्थिनींच्या हॉस्टेल प्रवेशाचा प्रश्न सुटेल, अशी माहिती विद्यापीठाचे कुलसचिव बळीराम गायकवाड यांनी दिली.

टॅग्स :मुंबईमुंबई विद्यापीठ