...अखेर पश्चिम उपनगरांतील रस्ते घेणार ‘मोकळा श्वास’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2018 03:07 AM2018-04-28T03:07:52+5:302018-04-28T03:07:52+5:30
पश्चिम उपनगरात सर्वात जास्त वाहतूककोंडी होणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लिंक रोडवरील दोन मार्गिका पावसाळ्यापूर्वी खुल्या केल्या जाणार आहेत.
मुंबई : मेट्रोच्या कामांमुळे सध्या मुंबईतील रस्त्यांचा श्वास गुदमरतोय. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेस बाहेर पडणे म्हणजे ट्रॅफिकच्या जंजाळात फसणे, असा काहीसा अनुभव मुंबईकरांना काही महिन्यांपासून येतोय. मेट्रोच्या कामाचा सर्वात जास्त परिणाम जाणवतोय तो पश्चिम उपनगरांतील रस्त्यांवर. मात्र, आता पश्चिम उपनगरातील रस्ते मोकळा श्वास घेणार आहेत.
पश्चिम उपनगरात सर्वात जास्त वाहतूककोंडी होणाऱ्या पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लिंक रोडवरील दोन मार्गिका पावसाळ्यापूर्वी खुल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे या रस्त्यांवर आता ‘ट्रॅफिक जाम’चे चित्र दिसणार नाही. मेट्रोच्या कामांमुळे या मार्गावरील दोन मार्गिका (लेन) बंद करण्यात आल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांना वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत होता. मात्र, आता पावसाळ्यापूर्वी या दोन्ही मार्गिका खुल्या करण्याचा निर्णय एमएमआरडीएकडून घेण्यात आला आहे.
पश्चिम उपनगरातील दहिसर ते अंधेरीपर्यंतच्या परिसरात दोन मेट्रोंना जोडण्याचे काम एमएमआरडीएकडून सध्या सुरू आहे. दहिसर ते डी.एन. नगर मार्गावरील मेट्रो-२ प्रकल्प आणि अंधेरी पूर्व ते दहिसर पूर्व मार्गावरील मेट्रो-७ प्रकल्प या दोेन्ही प्रकल्पांची कामे गेल्या दीड वर्षापासून सुरू आहेत. मात्र, आता या मार्गावरील अर्ध्याहून अधिक काम पूर्णत्वास आले आहे.
या मार्गावरील मेट्रोचे खांब आणि गर्डर टाकण्याचे कामही पूर्ण झाले
आहे. त्यामुळे या दोन्ही मार्गिकेवर टाकलेले बॅरिकेड्स काढण्यात
येणार आहेत. त्यामुळे या मार्गावरील पूर्व आणि उत्तरेकडील प्रत्येकी एक मार्गिका ३१ मेपर्यंत वाहतुकीकरिता खुली केली जाणार आहे. तसेच येत्या पावसाळ्यापूर्वी येथील सर्व बॅरिकेड्स हटविले जाणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरातील या दोन मार्गांवर प्रवास करणाºया प्रवाशांना वाहतूककोंडीपासून मुक्ती मिळणार आहे.