मुंबई : निकालाची १५ आॅगस्टची तिसरी डेडलाइनही मुंंबई विद्यापीठाला पाळता आली नाही. यामुळे विद्यापीठाने निकाल लावण्यात अपयशाची हॅट्ट्रिक केली असून विद्यार्थ्यांच्या पदरी पुन्हा निराशा आली आहे. अजूनही विद्यापीठाची उत्तरपत्रिका तपासणी सुरू असून गेल्या तीन ते चार दिवसांपासून तपासणीचा वेग मंदावला आहे. १५ आॅगस्टपर्यंत विद्यापीठाने ३३३ निकाल जाहीर केले आहेत.मुंबई विद्यापीठाने यंदा झालेल्या पदवी परीक्षांच्या उत्तरपत्रिकांची आॅनलाइन तपासणी सुरू केली. पण येणाºया तांत्रिक अडचणींमुळे उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला. आॅगस्टची १५ तारीख उजाडूनही उत्तरपत्रिका तपासणीचे काम सुरूच आहे. स्वातंत्र्यदिनीही प्राध्यापकांना त्यांचे हक्क मिळाले नाहीत. उत्तरपत्रिका तपासणीचे काम पूर्ण झाले नसल्याने २४५ प्राध्यापक कामावर रुजू होते. मंगळवारी ६ हजार १४८ उत्तरपत्रिकांची तपासणी केली.विद्यापीठासमोर अजूनही सव्वा लाखाहून अधिक उत्तरपत्रिकांचा डोंगर आहे. यातील अर्ध्या उत्तरपत्रिकांचे मॉडरेशनही विद्यापीठाला करायचे आहे. पण सर्वच बाबतीत विद्यापीठ शांत आहे. चारही बाजूने टीका होत लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तरीही विद्यापीठ विद्यार्थ्यांना कोणतेच स्पष्टीकरण देत नाही. कुलगुरू विद्यार्थ्यांना भेटत नाहीत. त्यामुळे सर्वच गोंधळ झाला आहे. याविषयी अनेक विद्यार्थ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, विद्यापीठ तरीही शांतच आहे. यापुढे विद्यार्थ्यांना निकाल कधी लागेल, याचीच प्रतीक्षा करायची आहे. विद्यापीठाने कोणतीही ठोस तारीख सांगितली नसल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.
अखेर विद्यार्थ्यांच्या पदरी निराशाच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2017 5:20 AM