अखेर ‘त्या’ तरुणीची राज्य महिला आयोगाने घेतली दखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2018 01:33 AM2018-06-09T01:33:25+5:302018-06-09T01:33:25+5:30
विवाह संकेतस्थळावरून २५ लाखांची फसवणूक होऊनही तरुणीला मदत करण्याऐवजी वरिष्ठांनी दिलेले अजब सल्ले आणि दोन वर्षांपासून व्यस्तचे संदेश पाठवणाऱ्या तपास अधिका-यामुळे अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता.
मुंबई : विवाह संकेतस्थळावरून २५ लाखांची फसवणूक होऊनही तरुणीला मदत करण्याऐवजी वरिष्ठांनी दिलेले अजब सल्ले आणि दोन वर्षांपासून व्यस्तचे संदेश पाठवणाऱ्या तपास अधिका-यामुळे अद्याप या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नव्हता. या प्रकरणी ‘लोकमत’ने वाचा फोडली. त्याची दखल घेत राज्य महिला आयोगाने आता कार्यवाहीचा अहवाल येत्या १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसे पत्र शुक्रवारी वरिष्ठांना पाठवण्यात आले आहे.
चारकोप परिसरात ३५ वर्षीय रेश्मा (नावात बदल) कुटुंबासह राहते. विवाह संकेतस्थळावरून ओळख झालेल्या संपत कुमार नावाच्या तरुणाने २०१६ मध्ये लग्नाचे आमिष दाखवून अवघ्या ४ महिन्यांत तिच्याकडून २५ लाख रुपये उकळले. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तिला धक्का बसला. या अनपेक्षित धक्क्यामुळे ती काही दिवस ट्रॉमामध्ये होती. यातून स्वत:ला कसेबसे सावरत तिने २७ आॅगस्ट २०१६ रोजी पोलिसांत धाव घेतली.
तेथील तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र गायकवाड यांनी ‘तू खरंच नशीबवान आहेस. आरोपीने तुझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवले नाहीत. बलात्कार झाला नाही. फक्त पैसेच गेले आहेत ना. त्यामुळे त्याला विसर आता आणि आयुष्यात पुढे हो,’ असा अजब सल्ला दिला. त्यामुळे ती आणखी खचली. तर तपास अधिकारी पीएसआय तोंडेला ती रोज कॉल करते तेव्हा त्यांच्याकडून फक्त ‘सॉरी आयएम बिझी नाऊ’चा संदेश पाठवण्यात येत होता. दोन वर्षे उलटूनही गुन्हा दाखल करण्यास मुहूर्त सापडत नसल्याने तिने ३१ मे रोजी पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांच्याकडे तक्रार दिली. मात्र अद्याप त्यांच्याकडूनही उत्तर मिळालेले नाही.
याची दखल लोकमतने ६ जूनच्या अंकात घेतली. त्यानंतर राज्य महिला आयोगाने या प्रकरणी आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.
त्यानंतर होणार पुढील कारवाई...
राज्य महिला आयोगाने कार्यवाहीचा अहवाल १५ दिवसांत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. याबाबतचे पत्र शुक्रवारी चारकोप पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना पाठवण्यात आले आहे. अहवालानुसार, पुढील कारवाई करण्यात येणार आहे.