Join us  

तब्बल १८० वर्षांनंतर ‘जे.जे.’ बनणार इंडियन ‘प्रॉपर्टी’; अखेर पुसली जाणार ब्रिटिशांची मालकी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2024 8:30 AM

येत्या काही महिन्यांत संस्थेच्या प्रॉपर्टी कार्डवरील ब्रिटिश मालकी पुसून टाकली जाणार असून, त्यावर शासनाचे नाव लावले जाणार आहे. 

संतोष आंधळेमुंबई : राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून अनेक रुग्ण जे. जे. हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी येतात. गेल्या १८० वर्षांपासून रुग्णसेवेत असलेली ही भव्य वास्तू आता लवकरच भारतीय मालमत्ता म्हणून ओळखली जाणार आहे. देशातील सर्वांत जुने आणि वैद्यकीय क्षेत्रात प्रतिष्ठेचे असलेले जे. जे. रुग्णालय आतापर्यंत ब्रिटिश संस्थेच्या नावावर होते. येत्या काही महिन्यांत संस्थेच्या प्रॉपर्टी कार्डवरील ब्रिटिश मालकी पुसून टाकली जाणार असून, त्यावर शासनाचे नाव लावले जाणार आहे. 

स्वातंत्र्याला ७६ वर्षे झाली, तरीही होते ब्रिटिशांचेच नाव 

सर जे. जे. समूह रुग्णालयाच्या अंतर्गत जी. टी. रुग्णालय, सेंट जॉर्जेस रुग्णालय आणि कामा आल्बेस ही रुग्णालये येतात. ४६ एकर परिसरातील या रुग्णालयाचे बांधकाम १८४५ मध्ये पूर्ण झाले. तेव्हापासून या वास्तूच्या मालमत्ता कागदपत्रांवर ‘सेक्रेटरी ऑफ स्टेट फॉर इंडिया इन कौन्सिल’ हे ब्रिटिशकालीन नाव आहे. ब्रिटिशांची सत्ता जाऊन ७६ वर्षे उलटली  असताना अद्याप जे. जे.ची ओळख ‘ब्रिटिश मालमत्ता’ अशीच होती. त्यामुळे रुग्णालयाच्या प्रॉपर्टीकार्डवरील हे नाव हटवून जागेची मालकी शासनाच्या नावावर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. 

जे. जे. रुग्णालयाच्या प्रॉपर्टी कार्डवर शासनाचे नाव लावण्यासाठी काही महिन्यांपासून प्रयत्न सुरू आहेत. या जमिनीच्या जुन्या नोंदी स्कॅन करून ठेवण्यात आल्या आहेत. रुग्णालय परिसरातील जमिनीची मोजणी करण्यात आली आहे. त्यामुळे काही महिन्यांत ही जमीन शासनाच्या नावावर होणार आहे.  - राजीव निवतकर, आयुक्त, वैद्यकीय शिक्षण विभाग.

टॅग्स :हॉस्पिटल