बरसल्या आनंद सरी, महिनाभरानंतर राज्यात पाऊस; पिकांना जीवदान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2023 07:56 AM2023-09-08T07:56:59+5:302023-09-08T07:57:06+5:30

जळगाव जिल्ह्यात  २४ तासांत जामनेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे.

After almost a month of rain in the state, it started raining again on Thursday | बरसल्या आनंद सरी, महिनाभरानंतर राज्यात पाऊस; पिकांना जीवदान

बरसल्या आनंद सरी, महिनाभरानंतर राज्यात पाऊस; पिकांना जीवदान

googlenewsNext

मुंबई : राज्यात तब्बल महिनाभर पावसाने दडी मारल्यानंतर गुरूवारी  राज्यभर पुन्हा बरसण्यास सुरुवात केल्याने माना टाकलेल्या पिकांना जीवदान मिळाल्याचा आनंद शेतकरी वर्गामध्ये आहे. संपूर्ण मघा नक्षत्र कोरडे गेल्यानंतर पूर्वा नक्षत्रात सहा सप्टेंबरपासून पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता.

जळगाव जिल्ह्यात  २४ तासांत जामनेर, मुक्ताईनगर व बोदवड तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात यावल आणि अमळनेरमध्ये सर्वात कमी पावसाची नोंद झाली आहे. सप्टेंबर महिन्यात पहिल्यांदाच पाऊस बरसला. या  पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार आहे. तसेच धरणांमधील जलसाठ्यालाही बूस्टर मिळणार आहे. पुढच्या पाच दिवसांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असताना शेतकऱ्यांनी कापसाला खत देण्यासाठी धावाधाव सुरू केली आहे.

जवळपास महिनाभराच्या खंडानंतर नाशिक जिल्ह्यात पाऊस पुन्हा सक्रिय होत असून, दोन दिवसांपासून काही भागात रिमझिम पाऊस सुरू आहे. जिल्ह्यात गेल्या ऑगस्ट महिन्यात पावसाने पाठ फिरवली होती. दोन्ही नक्षत्रे कोरडी गेल्यानंतर पूर्वा नक्षत्राच्या उत्तरार्धात पावसाचे भाकीत करण्यात आले होते. त्यानुसार ६ सप्टेंबरपासून जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला आहे.

छत्रपती संभाजीनगर : दीर्घ विश्रांतीनंतर मराठवाड्यात पावसाने हजेरी लावल्याने पाण्याअभावी करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये दुपारपासून पावसाला सुरुवात झाली. जालना शहर आणि जिल्ह्यात अनेक ठिकाणी रिमझिम पाऊस झाला. नांदेड, लातूर, हिंगोली जिल्ह्यात पाऊस झाला.

नांदेड जिल्ह्यात १६.६० मिमी पाऊस

नांदेड : वीस दिवसांच्या खंडानंतर जिल्ह्यात बुधवारी रात्रीपासून पावसाला प्रारंभ झाला आहे. सर्वदूर पाऊस होत असल्याने सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद पिकांना जीवदान मिळाले आहे. जिल्ह्यात २४ तासांत १६.६० मि. मी. पाऊस झाला. माहूर तालुक्यात सर्वाधिक ४२ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 

लातुरात रिमझिम पाऊस

लातूर : तब्बल महिनाभराच्या खंडानंतर रिमझिम पाऊस होत असल्याने खरीप पिकांना तात्पुरते जीवदान मिळाले आहे. गुरुवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. सायंकाळी शहरात रिमझिम पावसाला सुरुवात झाली. दरम्यान, जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ८.६ मिमी पाऊस झाला. अद्याप मोठ्या पावसाची प्रतीक्षा कायम आहे.

दोन आठवड्यांनंतर हिंगोलीत आगमन
हिंगोली : गत दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतर जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळाला आहे. गुरुवारी दिवसभर काही भागांत पावसाची रिपरिप तर काही भागांत थंडगार वारे सुटले होते. गोरेगाव, वारंगाफाटा, रामेश्वरतांडा, वसमत, डोंगरकडा, कौठा, जवळापांचाळ, नर्सी नामदेव, कळमनुरी, औंढा नागनाथ, कुरुंदा, जवळाबाजार, हट्टा, डोंगरकडा, पुसेगाव, केंद्रा (बु.), कनेरगावनाका आदी ठिकाणी पावसाने हजेरी लावली.

पश्चिम महाराष्ट्रात ढगांची दाटी, पण पाऊसच नाही
कोल्हापूर, पुणे : कोल्हापूर, सातारा आणि सांगली, जिल्ह्यात दिवसभर पावसाचे ढग होते, मात्र ते बरसलेच नाहीत. पुणे शहर आणि जिल्ह्यातही अशीच परिस्थिती होती. सोलापूर शहरात किरकोळ पाऊस झाला. कोकणात रत्नागिरीत मात्र महिनाभराच्या विश्रांतीनंतर पावसाने झलक दाखविली. कोल्हापूर जिल्ह्यात दुपारपासून ढगांची दाटी झाली आहे. वातावरणात गारवा असून, पावसाने मात्र हुलकावणी दिली. 

Web Title: After almost a month of rain in the state, it started raining again on Thursday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.