Join us  

"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 02, 2024 9:59 AM

२०२९ मध्ये भाजपचे सरकार येणार असल्याचे विधान अमित शाह यांनी केल्यानंतर नाना पटोलेंनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.

Nana Patole On Amit Shah : केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे जेष्ठ नेते अमित शाह हे दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबईच्या स्वामी नारायण मंदिर इथल्या योगी सभागृहात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वात महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास व्यक्त करून २०२९ मध्ये मात्र भाजप राज्यात स्वबळावर सत्तेत येईल, असे विधान यावेळी केंद्रीय अमित शाह यांनी केले. अमित शाह यांच्या या विधानामुळे महायुतीमध्ये खळबळ उडाली आहे. तर २०२४ मध्ये ते जिंकू शकत नाही हे अमित शाह यांनी मान्य केल्याची टीका काँग्रेसने केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने अमित शाह हे महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. लोकसभेला भाजपला बसलेला फटका पाहता अमित शाह यांनी पक्षाच्या नेतेमंडळींसह पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेत जोरदार तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी मुंबईतील भाजपचे आजी-माजी लोकप्रतिनिधी, नेते, पदाधिकारी यांच्या बैठकीत शाह यांनी मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना त्यांनी २०२४ मध्ये युतीचे सरकार असेल, मात्र २०२९ मध्ये भाजपचे सरकार असेल असं म्हटलं. अमित शाह यांनी केलेल्या वक्तव्यावर राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी २०२९ साठी अजून वेळ असल्याचे म्हटलं आहे.

"२०२९ साठी अजून वेळ आहे. पण २०२४ मध्ये ते जिंकू शकत नाही हे त्यांनी मान्य केलं आहे. महाराष्ट्रात जेव्हा निवडणुकीची प्रक्रिया सुरु होईल तेव्हा सत्तेत बसलेल्यांना लोक रस्त्यावरही फिरु देणार नाहीत अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अमित शाह हे देशाचे गृहमंत्री असून त्यांच्याजवळ त्यासंदर्भातील रिपोर्ट असेल आणि त्या आधारावर त्यांनी हे वक्तव्य केलं असेल," असं नाना पटोले यांनी म्हटलं.

काय म्हणाले अमित शाह?

"लोकसभा निवडणूक आपण तिसऱ्यांदा जिंकली. काँग्रेस शंभरीही गाठू शकली नाही, मग तरीही तुम्ही निराश का राहता? नैराश्य गाडून टाका. महाराष्ट्राची निवडणूक देशाची दशा आणि दिशा बदलेल. मला दिल्लीत विचारतात की महाराष्ट्रात काय होणार? मी आताही सांगतो, आपलीच सत्ता येणार आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आता आपल्याला महायुतीचेच सरकार आणायचे आहे, २०२९ मध्ये शुद्धपणे कमळाचे सरकार असेल," असं अमित शाह म्हणाले. 

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४अमित शाहनाना पटोलेदेवेंद्र फडणवीस