मुंबई: विविध करांच्या माध्यमातून महाराष्ट्र लाखो करोडो रुपयांची केंद्रावर उधळण करतो. पण त्या बदल्यात या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या पदरी फक्त निराशाच पडली आहे, असं राज्याचे मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले.
केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पाबाबत बोलताना अस्लम शेख म्हणाले की, 'कोरोना' महामारीतून आता कुठे देश सावरत असताना सर्वसामांन्यांसाठी काही दिलासादायक निर्णयांची अपेक्षा या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केली जात होती. पण दिलासा देणं तर दूरच राहिलं देशाची संपत्ती खाजगी कंपन्यांना विकण्याचा घाट सरकारने घातला आहे.
वर्षानुवर्षे सर्वसामान्यांसाठी सुरक्षित गुंतवणूकीचे माध्यम असलेली एलआयसी विकण्याची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आल्याने सर्वसामान्यांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. ज्या राज्यांमध्ये निवडणूका आहेत त्या राज्यांतील जनतेला खुश करण्यासाठी हजारो कोटींच्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्याने अर्थसंकल्पाला निवडणूक जाहिरनाम्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे, असंही अस्लम शेख यांनी सांगितले.
अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणताही नवीन कर लादला नाही- विजय लोहिया
कोरोनाच्या साथीला असूनही अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कोणताही नवीन कर लादला नाही. ही एक चांगली बाब असून केंद्र सरकार सध्याची अर्थव्यवस्था दूर करण्यासाठी वचनबद्ध आहे हे यावरून स्पष्ट होते. कापसावर 10% आयात शुल्क लावून घरगुती उत्पादकांना फायदा होईल. 35,000 कोटी लसीसाठीचे वाटप हे देखील कोविडविरूद्धच्या लढाईत सरकार कोणतीही कसर सोडणार नाही हे यावरून स्पष्ट होते. तसेच जीएसटीचे सरलीकरण देखील स्वागतार्ह आहे. आरोग्य आणि इन्फ्रावर बजेटचे वाटप वाढल्यास रोजगार वाढतील. ज्यामुळे सर्वसामान्यांची खर्च क्षमता वाढेल. - विजय लोहिया, अध्यक्ष भारत मर्चंट्स चेंबर