निवडणुकीनंतर मुंबई मनपा पुन्हा 'अॅक्शन मोड'वर, विकासकामांना होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2024 01:04 PM2024-11-25T13:04:25+5:302024-11-25T13:06:42+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगरसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पालिका आयुक्तांवर जबाबदारी सोपविल्याने यंदा संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी पालिका प्रशासनावर होती.
सीमा महांगडे
विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई शहर आणि उपनगरसाठी मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून पालिका आयुक्तांवर जबाबदारी सोपविल्याने यंदा संपूर्ण निवडणुकीची जबाबदारी पालिका प्रशासनावर होती. या कारणास्तव पालिकेतील जवळपास ६० ते ७० टक्के कर्मचारी अधिकारी वर्ग निवडणूक कामांत व्यस्त होते. मात्र, आचारसंहितेचा कालावधी संपत असल्याने निवडणूक काळात ब्रेक लागलेल्या पालिकेच्या कामांना पुन्हा सुरुवात होणार आहे.
मुंबईच्या प्रदूषण नियंत्रणासाठी पालिकेकडून विकासक आणि कंत्राटदारांसाठी २१ मार्गदर्शक तत्वे निवडणुकीपूर्वी जारी करण्यात आली आहेत. मात्र, निवडणुकीमुळे या तत्त्वांची अंमलबजावणी न करणाऱ्या विकासक आणि कंत्राटदारांविरोधात कठोर कारवाई करणे पालिकेला शक्य झाले नाही. या आठवड्यापासून त्याबाबत कारवाई सुरू होण्याची शक्यता असून त्याच्या नियोजनासाठी लवकरच नव्याने नियुक्त उपअभियंत्यांची बैठक घेण्यात येणार आहे. त्याचबरोबर शहरातील पहिल्या टप्प्यातील कामेदेखील कंत्राटदाराच्या आडमुठ्या भूमिकेमुळे अडकून पडली असून त्याबाबतही प्रशासनाकडून कडक कारवाई होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
मालमत्ता कर वसुलीसाठी आता अवघा एक महिना उरलेला आहे. निवडणुकीमुळे ती प्रक्रियाही संथ गतीने सुरू होती. मात्र, मतदानाच्या दुसऱ्या दिवशीपासूनच पालिकेच्या कर निर्धारण आणि संकलन विभागने त्यासाठी कंबर कसली आहे. त्यात प्रशासनाने मोठ्या थकबाकीदारांना जप्तीच्या नोटीसा पाठवल्या असून मालमत्ता कर भरण्यास टाळाटाळ करणाऱ्याच्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येणार आहे.
दरम्यान, पालिकेत ६९० कनिष्ठ व दुय्यम अभियंत्यांची पदभरती आचारसंहिता संपल्यानंतर सुरू करण्यात येणार होती. त्याची कार्यवाहीदेखील आता सुरू होणार आहे.
मत्स्यालयालाही मुहूर्त मिळणार
- जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणीसंग्रहालय म्हणजेच राणीच्या बागेचा आता विस्तार होणार असून त्यात परदेशी प्राण्यांचा समावेश, भुयारी मत्स्यालय आदी कामे केली जाणार आहेत.
- मत्स्यालयाची तांत्रिक कारणे, रखडलेली निविदा यामुळे हे काम रखडले होते. आता आचारसंहितेनंतर पुन्हा त्यासाठी वेगाने पाठपुरावा सुरू होईल अशी माहिती पालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.