Join us

मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर अंगणवाडी सेविकांचा संप मागे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 06, 2017 8:00 PM

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनांनी पुकारलेला राज्यव्यापी संप मागे घेण्यात आला आहे. शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अंगणवाडी कर्मचा-यांच्या कृती समितीची बैठक पार पडली.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर संप मागेविविध मागण्यांसाठी पुकारला होता संप सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देण्याचा निर्णय

मुंबई : गेल्या चार आठवड्यांपासून शुकशुकाट असलेल्या राज्यातील अंगणवाड्यांमध्ये सोमवारपासून पुन्हा किलबिलाट सुरू होणार आहे. कारण १० सप्टेंबरपासून संपावर असलेल्या अंगणवाडी कर्मचा-यांनी अखेर शुक्रवारी सायंकाळी संप मागे घेतला आहे. अंगणवाडी कर्मचारी कृती समितीसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या चर्चेनंतर संप मागे घेण्याची घोषणा कृती समितीने केली आहे.याआधी गुरूवारी राज्यभर जेलभरो आंदोलन करणा-या अंगणवाडी कर्मचाºयांनी शुक्रवारी हजारोंच्या संख्येने आझाद मैदानावर धडक दिली होती. दुपारी १ वाजण्याच्या सुमारास मुंबईतील जेलभरो आंदोलनाला सुरूवात होणार होती. तर १० ऑक्टोबरला मंत्रालयात घुसण्याचा इशाराही कृती समितीने दिला होता. त्याचीच दखल घेत मुख्यमंत्र्यांनी सायंकाळी ५ वाजता अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या प्रतिनिधींना वांद्रे-कुर्ला संकुल येथे चर्चेसाठी बोलावले. या बैठकीत सेवा ज्येष्ठतेच्या मुद्द्यावर मानधनवाढ आणि पोषण आहाराच्या रक्कमेत एक रुपयाने वाढ देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतल्याने संप मागे घेत असल्याची माहिती कृती समितीच्या निमंत्रक शुभा शमीम यांनी लोकमतला दिली.शमीम यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे अधिक समाधान मिळालेले नाही. कारण सेवाज्येष्ठतेनुसार मानधनवाढ देताना सेविकांना किमान मानधन हे ६ हजार ५०० रुपये मिळणार आहेत. तर त्यानंतर १० वर्षांच्या फरकाने सेवाज्येष्ठता लाभ मिळणार आहे. या लाभात १९५ रुपये, १४० रुपये अशी तफावत असेल. त्यामुळे ज्येष्ठ सेविकांना नव्या सेविकांहून थोडेसे अधिक मानधन मिळेल. याउलट पोषण आहाराच्या रक्कमेत प्रति बालकामागे एक रुपयाची वाढ मिळाल्याचेही शमीम यांनी सांगितले. अशाप्रकारे मुख्यमंत्र्यांनी एकूण ४० कोटी रुपयांची भर अर्थ संकल्पात केली आहे. हा कृती समितीचा मोठा विजय आहे. याच निर्णयामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने संप मागे घेण्याचा निर्णय घेतला. संप मागे घेतल्याची माहिती देण्यासाठी उद्यापासून सुरूवात होईल. दोन दिवसांत राज्यभरातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना संप मागे घेण्याचा संदेश पोहचवला जाईल. तर सोमवारपासून पोषण आहार वाटपाचे कामही नियमितपणे सुरू होईल. मात्र मानधवाढीसाठी यापुढेही लढा सुरूच ठेवणार असल्याचे शमीम यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मुंबई