Join us

मुंबईत बेस्ट पाठोपाठ आता ओला, उबर चालक जाणार संपावर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 2:41 PM

बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करून मुंबईकरांना वेठीस धरले असतानाच आता ओला व उबर चालकही येत्या आठवड्यात संपावर जाणार आहेत.

- चेतन ननावरे

मुंबई : बेस्ट कर्मचाऱ्यांनी संप करून मुंबईकरांना वेठीस धरले असतानाच आता ओलाउबर चालकही येत्या आठवड्यात संपावर जाणार आहेत. ओलाउबर या कंपन्यांकडून चालकांना जाणीवपूर्वक ब्लॅक लिस्ट केले जात असल्याचा आरोप ओला उबर चालक-मालक संघटनेने केला आहे. या ब्लॅक लिस्ट केलेल्या गाड्यांच्या जागी कंपनी स्वतःच्या गाड्या सुरू करत असल्याने येत्या आठवड्यात संपावर जाणार असल्याचे ओला उबर चालक-मालक संघटनेचे सचिव अनंत कुटे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.

कुटे म्हणाले की, गेल्या दहा दिवसात ओला व उबर या दोन्ही कंपन्यांनी मिळून सुमारे 5000 चालकांवर बेशिस्तीची कारवाई केली आहे. मुळात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई सुरू आहे. कंपनीकडून जाणीवपूर्वक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. ऑक्टोबर महिन्यात दिलेले आश्वासन सरकार किंवा कंपनीने अद्याप पाळलेले नाही. याउलट वाहनचालकांवर कोणतेही कारण न देता कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. म्हणूनच संघटनेने या कारवाईविरोधात संपाचा निर्णय घेण्याचे ठरविले आहे. सोमवारी संपाबाबत अधिकृत घोषणा केली जाईल. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मागील संपावेळी अधिवेशन संपताच तातडीची बैठक घेण्याचे आश्वासन केले होते. मात्र अधिवेशन संपून प्रदीर्घ काल उलटल्यानंतरही मुख्यमंत्र्यांनी कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. परिणामी ओला, उबर चालक व मालकांना ईएमआय किंवा घर खर्च यापैकी एकच गोष्ट भागवता येईल इतक्या उत्पन्नावर काम करावे लागत आहे. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या दोन चालकांना काल घाटकोपर पोलिसांनी ताब्यात घेत सोडून देण्यात आले. मात्र आजही कोणतेही कारण न सांगता पोलिसांनी संबंधितांना पुन्हा ताब्यात घेतले. या दडपशाहीचा निषेध करण्यासाठी एका आठवड्यात ओला व उबर चालक बेमुदत संपाची हाक देतील.

टॅग्स :ओलाउबरमुंबईसंप