Join us

'ब्लू व्हेल' गेमनंतर आता 'डार्क नेट'चा विळखा, गोवंडीतील मुलगा ठरला पहिली शिकार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2017 4:50 PM

ऑनलाइन गेम 'ब्लू व्हेल'च्या जाळ्यातून तरुणाईची सुटका करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असताना आता 'डार्क नेट' नावाच्या गेमची त्यात भर पडली आहे. ब्लू व्हेलप्रमाणे डार्क नेट हा गेमदेखील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची भीती आहे.

ठळक मुद्दे ब्लू व्हेलप्रमाणे डार्क नेट हा गेमदेखील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची भीती गोवंडीत दहावीत शिकणारा 15 वर्षीय अल्पवयीन तरुण घर सोडून गेला आहेगोवंडी पोलिसांसह, क्राईम ब्रांच, दहशतवादविरोधी पथक हेदेखील या मुलाचा शोध घेत आहेत

मुंबई - ऑनलाइन गेम 'ब्लू व्हेल'च्या जाळ्यातून तरुणाईची सुटका करण्याचं मोठं आव्हान पोलिसांसमोर असताना आता 'डार्क नेट' नावाच्या गेमची त्यात भर पडली आहे. ब्लू व्हेलप्रमाणे डार्क नेट हा गेमदेखील तरुणांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याची भीती आहे. धक्कादायक म्हणजे गोवंडीतील एक अल्पवयीन तरुण डार्क नेटचा शिकार झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. गोवंडीत दहावीत शिकणारा 15 वर्षीय अल्पवयीन तरुण घर सोडून गेला आहे. कुटुंबियांनी यासंबंधी पोलिसांत तक्रार केली आहे. 

29 ऑक्टोबरला कुटुंबीय चित्रपट पाहण्यासाठी घराबाहेर गेला असताना हा मुलगा घर सोडून गेला असल्याची माहिती आहे. घर सोडण्याआधी त्याने चिठ्ठी लिहून ठेवली होती.‘मला शोधू नका मी मेलो असे समजा’ असं त्याने चिठ्ठीत लिहिलं होतं. जाताना त्याने घरातील 15 हजार रुपये नेले आहेत. चिठ्ठी मिळाल्यानंतर कुटुंबाची धावाधाव सुरु झाली. अखेर त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार केली. हा मुलगा आपल्या आत्यासोबत राहत होता. त्याचे आई-वडिल मोठ्या मीडिया हाऊसमध्ये काम करत असल्याची माहिती आहे. 

मुलाच्या मित्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तो गेल्या काही दिवसांपासून सतत डार्क नेट गेम खेळत होता. ब्लू व्हेल गेमप्रमाणे डार्क नेटमध्येही वेगवेगळ्या प्रकारचे टास्क दिले जातात. त्यात घर सोडून जाण्याचं टास्क दिली असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. डार्क नेटबद्दल जास्त काही माहिती हाती नसली, तरी हा गेमदेखील ब्लू व्हेलइतकाच धोकादायक असल्याचं सांगितलं जात आहे. याप्रकरणी गोवंडी पोलिसांसह, क्राईम ब्रांच, दहशतवादविरोधी पथक हेदेखील या मुलाचा शोध घेत आहेत.

काय असते ब्लू व्हेल चॅलेंज?ब्लू व्हेल हा व्हिडीओ गेम असून २0१३ साली रशियात त्याची सुरुवात झाली. तो खेळणा-याला 50 आव्हाने (चॅलेंजेस) दिली जातात. आव्हाने ५0 दिवसांत पूर्ण करायची असतात. आधी सोपी व नंतर नंतर कठीण आव्हाने दिली जातात. त्यात हाताच्या नसा कापणे, जनावराला मारणे व अंतिम टप्प्यात आत्महत्या करायला सांगणे आदींचा समावेश असतो. प्रत्येक आव्हान पूर्ण केल्यानंतर ते चित्रण गेमच्या क्युरेटरला पाठवायचे असते. अखेर सहभागींना आत्महत्या करण्याचे आव्हान दिले जाते. 

टॅग्स :डार्क नेटब्लू व्हेलऑनलाइनसोशल मीडिया