'ब्रेक'नंतर नाटकांची रंगभूमीवर दमदार 'एन्ट्री'...!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 01:22 AM2020-12-14T01:22:44+5:302020-12-14T01:22:52+5:30
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नऊ महिन्यांचा दुरावा सहन करावा लागल्यानंतर नाटकांचा पडदा वर गेला असून, रसिकांची ओंजळ नाट्यसुमनांनी भरू लागली आहे.
- राज चिंचणकर
मुंबई : नाट्यगृहे उघडण्यासाठी ५ नोव्हेंबरपासून परवानगी मिळाल्यानंतर, रंगमंचावर प्रत्यक्ष नाटक सादर होण्यासाठी ११ डिसेंबरपर्यंतचा कालावधी जावा लागला. मात्र आता काही मराठी नाटके रंगभूमीवर 'एन्ट्री' घेण्यास सरसावली आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे नऊ महिन्यांचा दुरावा सहन करावा लागल्यानंतर नाटकांचा पडदा वर गेला असून, रसिकांची ओंजळ नाट्यसुमनांनी भरू लागली आहे.
रंगभूमीवर प्रत्यक्ष नाटक सुरू होत असताना, रंगमंचावरील कलावंतांपासून पडद्यामागील कलाकार, बॅकस्टेज कर्मचारी, तिकीटबारीवरील कर्मचारी आदी नाट्यसृष्टीचा प्रत्येक घटक कार्यरत झाला आहे. मार्च महिन्यात लॉकडाऊन जाहीर झाल्यावर अचानक 'ब्रेक' लागलेली नाटके पुन्हा एकदा रंगभूमीवर येण्यास सज्ज होत आहेत. ११ डिसेंबर रोजी पुण्यात 'संगीत संत तुकाराम' या नाटकाच्या नांदीने रंगभूमीवरचा पडदा वर गेला. लगेच १२ डिसेंबर रोजी 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या नाटकाचा प्रयोग पुण्यात रंगला; तर याच दिवशी कल्याणला 'तू म्हणशील तसं!' या नाटकाचा प्रयोग झाला. मात्र खुद्द मुंबई शहरात, बोरीवलीत २० डिसेंबरला 'इशारों इशारों में' या नाटकाने रंगभूमीचा पडदा उघडत असल्याचे या नाटकाच्या टीमने जाहीर केले आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाट्यक्षेत्रातील विविध घटकांशी संवाद साधला असता, रंगभूमीवर पुन्हा एकदा चैतन्य पसरण्याची स्पष्ट चिन्हे दिसून येत आहेत.
राहुल भंडारे (नाट्यनिर्माता):
सध्या नाटकांना सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. एवढ्या मोठ्या काळानंतर रसिक नाटकांना येतील की नाही अशी भीती होती; परंतु लोकांचा उत्साह पाहून आमचा हुरूप वाढला आहे. बालनाट्यांना मात्र अजून परवानगी मिळालेली नाही आणि ती मिळण्याच्या प्रतीक्षेत आम्ही आहोत.
सागर कारंडे (अभिनेता):
नाटक हे घरबसल्या अनुभवण्याचे माध्यम नाहीच. त्यामुळे आता नाटक अनलॉक होत असताना रसिक नाटकांना नक्की येतील असा विश्वास आहे. फक्त या नऊ महिन्यांच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या वगैरे गेल्या आहेत; त्यामुळे नाटकाची तिकिटे त्यांना परवडतील का, असा एक प्रश्न आहे. पण नाट्यगृहांच्या भाड्यात मिळालेली सवलत; तसेच टोलमाफीही मिळाल्याने आम्ही मात्र आमच्या नाटकाचे तिकीट कमी केले आहे.
दीपक सावंत (नाट्यगृह व्यवस्थापक):
गेल्या दोन-तीन दिवसांत मराठी नाटकांना मिळालेला प्रतिसाद पाहता, नाट्यसृष्टीला नक्कीच चांगले दिवस येतील. एकूणच वातावरण निवळल्यानंतर, जानेवारीत नाटके पूर्वीसारखी धावू लागतील याची खात्री आहे.
प्रदीप कबरे (अभिनेते-निर्माते):
२ जानेवारीला माझ्या 'खिडकी' या प्रायोगिक नाटकाचा बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहाच्या मिनी थिएटरमध्ये सर्व नियम पाळून आम्ही प्रयोग करत आहोत. मिनी थिएटरची क्षमता लक्षात घेता ५० टक्के क्षमतेने माझा हा प्रयोग हाऊसफ़ुल्ल होईल याबद्दल मला शंका नाही.
प्रणित बोडके (नाट्य व्यवस्थापक):
नाटके सुरू झाली आणि त्यांना चांगला प्रतिसादही मिळत आहे. सध्या ५० टक्के क्षमतेत शनिवार-रविवार आम्ही प्रयोग लावत आहोत. मात्र १०० टक्के उपस्थितीची परवानगी मिळाली की आम्ही इतर दिवशीही प्रयोग लावणार आहोत. आम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून सध्या वाटचाल करत आहोत.
हरी पाटणकर (बुकिंग व्यवस्थापक):
पुणे आणि कल्याणला ज्या पद्धतीने नाटकांना बुकिंग झाले; त्यावरून लोक नाटकांना येणार याची खात्री वाटते. लोक शिस्त पाळून नाटकांना येत आहेत हेही जाणवते. लोक आता कोरोनाला कंटाळले आहेत; त्यामुळे नाटकांना गर्दी होईल असे वाटते. श्री शिवाजी मंदिरात जानेवारीत नाट्यप्रयोग सुरू होतील असा अंदाज आहे.