लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : ब्रेक के बाद दाखल झालेल्या मुसळधार पावसाने बुधवारी सकाळी पुन्हा एकदा मुंबईकरांची दाणादाण उडवली. भल्या पहाटेपासून कोसळत असलेल्या पावसाने दुपारपर्यंत मारा कायम ठेवल्याने मुंबई जलमय हाेईल, असे चित्र निर्माण झाले होते. मात्र सकाळी ११ नंतर पावसाचा जाेर किंचित कमी झाला आणि मुंबई पुन्हा वेगाने धावू लागली.
मुंबईवर बुधवारी पहाटेपासून पावसाचे ढग दाटून आले हाेते. सकाळी ९.३० वाजेपर्यंत मुंबईत ठिकठिकाणी पावसाचा तुफानी मारा सुरू होता. टपाेऱ्या थेंबाचा वर्षाव होत असतानाच ठिकठिकाणच्या सखोल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली होती. याचा परिणाम मुंबईच्या वेगावर झाला. रस्ते वाहतूक किंचित धीमी झाली होती. नेहमीप्रमाणे लाल बहादूर शास्त्री मार्गावर कमानी आणि शीतल तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर माटुंगा येथील गांधी मार्केट आणि दादर येथील हिंदमाता परिसरात पाणी तुंबेल, अशी परिस्थिती निर्माण झाली हाेती.
सुदैवाने सकाळी साडेदहा ते अकरा वाजल्यापासून पावसाचा जोर ओसरला. दरम्यान, दुपारी, सायंकाळीही मुंबईवर पाऊस घेऊन आलेल्या ढगांनी गर्दी केली होती. प्रत्यक्षात मात्र पावसाने हुलकावणी दिली. १७ जून रोजी कोकण आणि गोव्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
* दिवसभरातील पावसाची नोंद
कुलाबा ९८.६ मिमी
सांताक्रूझ २३.८ मिमी
----------------------------------