नवी मुंबई : निवडणुका संपताच शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी सुरू झाली आहे. विजयी व पराभूत उमेदवारांनी पालिकेची परवानगी न घेता मतदारांचे आभार व्यक्त करण्यासाठी होर्डिंग लावले असून, या अतिक्रमणाकडे पालिका प्रशासन दुर्लक्ष करत आहे. आचारसंहिता सुरू असल्यामुळे एक महिना शहरात अनधिकृत होर्डिंगबाजी बंद होती. चुकूनही होर्डिंग दिसले तरी त्यावर पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जात होती. परंतु निकाल जाहीर झाल्यापासून पुन्हा सर्व राजकीय पक्षांनी नियम धाब्यावर बसवून व उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून फुकटची जाहिरातबाजी सुरू केली आहे. शहरातील सर्व प्रमुख रस्ते व चौकांमध्ये होर्र्डिंग लावण्यात आले आहेत. नेरूळ रेल्वे स्टेशनसमोर विविध पक्षांच्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करणारे फलक लावण्यात आले आहेत. इतरही काही सामाजिक संस्थांचे होर्डिंग असून त्यांना पालिकेची परवानगी घेण्यात आलेली नाही. वाशी, सीवूड, बेलापूर, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली सर्वच विभागांत शेकडो होर्डिंग्ज लावले आहेत. निवडून आलेल्या व पराभव झालेल्या उमेदवारांनीही मतदारांचे आभार मानले आहेत. परंतु आभाराची जाहिरातबाजी करताना पालिकेचा महसूल मात्र बुडविण्यात आला आहे. महापालिकेचे अधिकारीही या फुकटच्या जाहिरातबाजीकडे दुर्लक्ष करत आहेत. राजकीय पक्षांच्या दबावामुळे कारवाई केली जात नाही. यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.
‘ब्रेक के बाद’ होर्डिंगबाजी सुरू
By admin | Published: April 29, 2015 12:26 AM