Join us

CSMT Bridge: ज्यांच्या चुकीच्या ऑडिटने केला घात, त्यांच्या सल्ल्यानेच पुलांच्या दुरुस्तीचा घाट!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2019 2:50 AM

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील धोकादायक पुलाला सुस्थितीत असल्याचा निर्वाळा किरकोळ दुरुस्ती सुचवणाऱ्या आणि निष्पाप पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रोफेसर डी. डी. देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिस्ट कंपनीच्या नीरज कुमार देसाई या आॅडिटरवर महापालिकेने कारवाई सुरू केली.

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) येथील धोकादायक पुलाला सुस्थितीत असल्याचा निर्वाळा किरकोळ दुरुस्ती सुचवणाऱ्या आणि निष्पाप पादचाऱ्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या प्रोफेसर डी. डी. देसाई असोसिएट इंजिनीअरिंग कन्सल्टंट अ‍ॅण्ड अ‍ॅनॅलिस्ट कंपनीच्या नीरज कुमार देसाई या आॅडिटरवर महापालिकेने कारवाई सुरू केली. त्याने आॅडिट केलेल्या ३८ पुलांच्या फेरतपासणीचा निर्णयही घेतला. मात्र दुसरीकडे नवीन स्ट्रक्चरल आॅडिटरचा शोध सुरू असतानादेखील देसाईने केलेल्या शिफारशीनुसार शहरातील १६ पुलांच्या दुरुस्तीचा घाट प्रशासनाने घातला आहे.सीएसएमटी स्थानकाला जोडणारा हिमालय हा पादचारी पूल १४ मार्च रोजी संध्याकाळी कोसळला. या दुर्घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेच्या चौकशीत स्ट्रक्चरल आॅडिटर नीरज देसाईने २०१८ मध्ये दिलेल्या अहवालात या पुलाच्या किरकोळ दुरुस्तीची शिफारस केली होती, असे उजेडात आले. त्यानंतर तत्काळ आयुक्त अजय मेहता यांनी संबंधित डी. डी. देसाई या कंपनीला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू केली. तसेच आॅडिटर नीरज देसाईला पोलिसांनी गेल्या आठवड्यात अटकही केली.आॅडिटर देसाईच्या आॅडिट अहवालावरच संशय व्यक्त होत असल्याने शहर भागातील ३८ पुलांची फेरतपासणी करण्याचा निर्णयही घेण्यात आला.या कामासाठी नवीन स्ट्रक्चरल आॅडिटर नेमण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्याचवेळी शहरातील १६ पुलांच्या किरकोळ दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर पालिका प्रशासनाने मंजुरीसाठी मांडला आहे. या १६ पुलांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ८६ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.मे. जैन कन्स्ट्रक्शन कंपनीमार्फत दुरस्तीचे काम करून घेण्यात येणार आहे. देसाईच्या चुकीच्या अहवालामुळे हिमालय पादचारी पूल धोकादायक असल्याचे समजू शकले नाही. तरीही याच आॅडिटरच्या अहवालानुसार पूल दुरुस्तीचे हे काम करणे म्हणजे मुंबईकरांचा जीव धोक्यात घालण्यासारखेच असल्याची नाराजी विरोधकांकडून व्यक्त होत आहे.‘स्थायीला अडचणीत आणण्याचा डाव’स्ट्रक्चरल आॅडिटर देसाईच्या बेजबाबदारपणामुळे पूल कोसळून सहा लोकांचा बळी गेल्याचे याआधीच समोर आले आहे. तरीही पुन्हा त्याच आॅडिटरच्या अहवालाच्या आधारे प्रस्ताव आणण्याचा प्रकार म्हणजे स्थायी समितीला अडचणीत आणण्याचा पालिका प्रशासनाचा डाव असल्याची नाराजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी व्यक्त केली आहे.या पुलांची होणार दुरुस्ती : ग्रॅण्ट रोड रेल्वेवरील पूल, आॅपेरा हाउस पूल, फ्रेंच पूल, फॉकलॅन्ड रोड (डायना ब्रिज), ग्लोरिया चर्च उड्डाणपूल, एसव्हीपी रोड रेल्वेवरील पूल, वाय. एम. उड्डाणपूल, सीताराम सेलम वाय ब्रिज उड्डाणपूल, ईस्टर्न फ्रीवे, सर पी. डिमेलो पादचारी पूल, डॉकयार्ड रोड पादचारी पूल, प्रिन्सेस स्ट्रीट पादचारी पूल.भुयारी मार्गांचीही दुरुस्तीहाजीअली भुयारी मार्ग, सीएसएमटी भुयारी मार्ग, चर्चगेट उत्तर भुयारी मार्ग, चर्चगेट दक्षिण भुयारी मार्ग या भुयारी मार्गांचीही दुरुस्ती लवकरच हाती घेण्यात येणार आहे.१३ कोटी ८६ लाखांचा खर्चशहरातील १६ पुलांच्या किरकोळ दुरुस्तीचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर पालिका प्रशासनाने मंजुरीसाठी मांडला आहे. या १६ पुलांच्या दुरुस्तीसाठी १३ कोटी ८६ लाख रुपये खर्च केला जाणार आहे.

 

टॅग्स :सीएसएमटी पादचारी पूल दुर्घटनाछत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस