Join us

टाटा हॉस्पिटलच्या बाहेर 'जय श्री राम' न म्हटल्याने दिलं नाही जेवण; व्हायरल व्हिडीओवरुन नवा वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2024 8:16 PM

परळ येथील टाटा रुग्णालयाच्या परिसरात जेवण देण्यावरुन वाद झाल्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Tata Hospital Viral Video :मुंबईतीलटाटा हॉस्पिटलमध्ये कॅन्सरच्या उपचारासाठी देशभरातून येत असतात. देशभरातून रुग्ण येत असल्यामुळे तिथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.रुग्णांसोबत त्यांचे कुटुंबीयही रुग्णालयाच्या फेऱ्या मारत असतात. त्यात बरेच लोक असे असतात ज्यांना मुंबईत राहण्याचा खर्च देखील परवडत नाही. त्यामुळे हॉस्पिटलच्या आवारात किंवा बाहेर कुठेतरी झोपतात आणि जेवतात. अशावेळी अनेक स्वयंसेवी संस्था रुग्णांच्या नातेवाईकांना मोफत जेवण देतात. जेणेकरून कोणीही उपाशी राहू नये. मात्र, आता एका जेवण देणाऱ्या व्यक्तीने विशिष्ट धर्माच्या महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मुंबईतील टाटा रुग्णालयाबाहेरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये एक व्यक्ती लोकांना अन्न वाटप करताना दिसत आहे. अन्न वाटप करणाऱ्या व्यक्तीवर अन्न वाटप करताना लोकांना जय श्री राम म्हणण्यास सांगितल्याचा आरोप आहे. व्हिडिओमध्ये तोंडाला स्कार्फ बांधलेली एक महिला जेवण वाटप करणारी व्यक्ती घोषणा देण्यास सांगत असल्याचे म्हणत आहे. घोषणा न दिल्याने जेवणही दिले नसल्याचे महिलेने सांगितले.

कथित व्हिडिओमध्ये जेवण वाढणाऱ्या वृद्धाने महिलेसोबत गैरवर्तन केल्याचा दावा करण्यात आला आहे. व्हिडीओमध्ये काही लोक असे म्हणतानाही दिसत आहेत की, जेवण द्यायचे नसेल तर देऊ नका पण अशा प्रकारे जबरदस्तीने घोषणा देण्यास सांगता येणार नाही. व्हिडिओ काढणारी व्यक्ती तिथे उभ्या असलेल्या लोकांना विचारत आहे की त्यांनी जय श्री रामची घोषणा दिली आहे का?. यावर बरेच लोक असं बोलण्यात यात काही नुकसान नसल्याचे म्हणत आणि आम्ही हे केले आहे, असं म्हणत आहेत.

अशातच हॉस्पिटलमधील लोक भेदभाव करत नाहीत, तर जेवण देणारे असे का करत आहेत, असा प्रश्न एका व्यक्तीने विचारले. तुम्ही लोक अन्न वाटायला आला आहात, अन्न वाटप करून जा, असं त्या व्यक्तीने म्हटलं. त्यावर जेवण वाढणाऱ्या वृद्ध व्यक्तीने पुन्हा  जय श्री राम म्हणाल तर खायला मिळेल, जास्त फालतू बोलू नका, असं म्हटलं. व्हिडिओ बनवणाऱ्या व्यक्तीने वृद्धाला भडकवण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी शांतपणे जेवणाचे वाटप सुरु ठेवले. 

दुसरीकडे, चेहरा झाकलेल्या महिलेने सांगितले की, जेवण वाटप करणाऱ्या व्यक्तीने तिला जय श्री राम म्हणायला सांगितले. जेव्हा मी तसे केले नाही तेव्हा त्याने जेवण देण्यास नकार दिला. वृद्धाने पीडित महिलेला दहशतवादी म्हटल्याचा आरोप काही लोकांनी केला. मात्र यावर वृद्ध व्यक्तीने स्पष्टपणे नकार दिला आणि आपण फक्त भगवान श्री रामच्या घोषणा देण्यास सांगितले आणि कोणालाही दहशतवादी म्हटले नाही. मला माहित आहे की दहशतवादी काय असतो. ही भगवान श्रीरामाची भूमी आहे आणि जयश्रीराम म्हणण्यात काय गैर आहे, असे वृद्धाने म्हटलं. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोईवाडा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

दरम्यान, काँग्रेसचे राज्यसभा खासदार आणि काँग्रेस अल्पसंख्याक मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष इम्रान प्रतापगढी यांनीही या वादात उडी घेतली आहे. जेवायला घालून घोषणा देण्यास सांगणाऱ्यांना पुण कसं मिळणार आहे. अशा मानसिकतेवर समाजाने जाहीर बहिष्कार टाकला पाहिजे, असं इम्रान प्रतापगढी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :मुंबईसोशल व्हायरलटाटापोलिस