मुख्यमंत्र्यांनंतर श्रीकांत शिंदेंही शेती करण्यात रमले; दोन दिवस केली भाताची लावणी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2023 10:01 AM2023-07-18T10:01:21+5:302023-07-18T10:18:38+5:30
श्रीकांत शिंदे हे त्यांच्या दोन दिवस भात लागणीत व्यस्त होते. आपल्या शेतात त्यांनी मशीनच्या साह्याने चिखलणी केली.
मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील रोजच्या धावपळीतून थोडा वेळ काढत आपल्या गावी अधूनमधून जाताना दिसतात. महाबळेश्वर तालुक्यातील दरे तांब येथे आल्यावर ते शेतात मग्न असतात. एकनाथ शिंदे यांचे शेती करतानाचे अनेक फोटो आणि व्हिडिओ देखील समोर येत असतात. आता त्यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे हे देखील शेतीत रमल्याचे दिसून आले.
श्रीकांत शिंदे हे त्यांच्या दोन दिवस भात लावणीत व्यस्त होते. आपल्या शेतात त्यांनी मशीनच्या साह्याने चिखलणी केली. त्या पाठोपाठ त्यांनी भाताचा तरवा काढण्यास ही मदत केली. याबाबत श्रीकांत शिंदे यांनी ट्विट देखील केलं आहे. समाधान आणि सुख या शब्दांचा समानार्थी शब्द फक्त गावचे घर हाच असतो. दिवस वेगाने सरकतात पण अजूनही गावचे घर आठवलं की मग जगण्याची खरी श्रीमंती म्हणजे काय ते समजते. गावच्या शेतीत रमणे आणि गुरावासरांना मायेने जवळ घेणे ही गोकुळश्रीमंती अनुभवताना त्याबद्दल शब्दांत लिहिणे हे कठीण असते, असं श्रीकांत शिंदे म्हणाले.
दिवस वेगाने सरकतात पण अजूनही गावचे घर आठवलं की मग जगण्याची खरी श्रीमंती म्हणजे काय ते समजते. pic.twitter.com/LxEBKSOo4i
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) July 16, 2023
पानापानातुन वाढणारे झाड, भातशेतीत मळ्यात वाढणारी भातरोपं, जिवंत बहरणारा हिरवा डोंगर आणि पावसाचा कणाकणात रुजण्याचा सोहळा हे सगळं पाहणे म्हणजे एक ऊर्जा असते. शेतीत राबताना त्या बळीराजाच्या कष्टाची जाणीव आपल्या हातात असलेल्या जबाबदारीची जाणीव देते. आज भाताची लावणी करताना तीच जाणीव प्रत्येक रोपात होती. गुरंवासरे त्यांचा मुकेपणा, त्यांची माया हे सगळं अबोल असते पण तरीही ते खूप बोलकं असते. हे गावपण अनुभवण्याचा एक वेगळाच आनंद आहे. निसर्गाचं हे देणं जगण्याचा भाग असणं यापेक्षा वेगळं भाग्य नसल्याचं श्रीकांत शिंदे यावेळी म्हणाले.
शब्दांविनाही जिव्हाळ्याचा संवाद होऊ शकतो !
— Dr Shrikant Eknath Shinde (@DrSEShinde) July 17, 2023
#DrShrikantEknathShinde#Shivsenapic.twitter.com/3duHl0NZ34