मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनंतर शरद पवार अन् गृहमंत्र्यांनाही धमकीचे फोन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2020 02:03 AM2020-09-08T02:03:14+5:302020-09-08T06:55:29+5:30
विधानसभेत कंगनाच्या निषेधाचा ठराव मांडणार?
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, गृहमंत्री अनिल देशमुख व शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही दुबईहून धमकीचे फोन आले असून मुंबई पोलिसांची क्राईम ब्रँच याचा तपास करीत आहे.
याबाबत गृहमंत्री देशमुख यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या ‘सिल्वर ओक’ बंगल्यावर किमान दहा वेळा फोन आले आहेत. तर मुख्यमंत्री ठाकरे यांचे निवासस्थान आलेल्या मातोश्री आणि वर्षा बंगल्यावर पाच-सात वेळा फोन आले. सर्व फोन भारताबाहेरून आणि एकाच नंबरहून आले आहेत. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ वर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकाने दुबईतून फोन करून धमकी दिली होती.
कंगना रनौत हिने मुंबईला पाक व्याप्त काश्मीरची उपमा दिल्यामुळे शिवसेनेकडून विधानसभेत कंगनाच्या निषेधाचा ठराव आणला जाण्याची शक्यता आहे. मुंबईचा अवमान करणाऱ्या कंगनाला गृह विभागाकडून वाय दर्जाची सुरक्षा दिली, यावरून तिचा बोलविता धनी कोण आहे, हे स्पष्ट होते, असा टोला एका शिवसेना नेत्याने लगावला. तर महाराष्ट्रातील जनता सहिष्णू आहे ती हे सगळे बघत आहे. त्यामुळे तिच्याआडून कोण राजकारण करत आहे, हे आता जनतेला वेगळे सांगण्याची गरज उरलेली नाही, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली.
अधिवेशनावर कोरोनाचे सावट
कोरोनाच्या सावटाखाली दोन दिवसीय पावसाळी अधिवेशनाला सोमवारी सुरुवात झाली. कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आलेल्यांनाच प्रवेश देण्यात येत असल्याने प्रवेशद्वारावर एकच गोंधळ उडाला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्तक्षेपानंतर आमदारांना आतमध्ये सोडण्यात आले.
एकूण ५८ पॉझिटिव्ह
गेली तीन दिवस विधानभवन परिसरात आमदार, अधिकारी, पत्रकार, कर्मचारी यांची कोरोना चाचणी सुरू होती. २११५ लोकांची तपासणी करण्यात आली, पैकी ५८ जण पॉझिटिव्ह आढळून आले. त्यातील ७ जण व्हीआयपी आहेत.
उपसभापती पदासाठी
आज निवडणूक
विधानपरिषदेच्या उपसभापतीपदासाठी मंगळवारी निवडणूक होणार असून महाविकास आघाडीकडून शिवसेनेच्या आमदार नीलम गोºहे तर भाजपकडून विजय उर्फ भाई गिरकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. संख्याबळानुसार सभागृहात शिवसेनेचे १४, काँग्रेस ८, राष्ट्रवादीचे ९ असे ३१ सदस्य आहेत. याशिवाय दोन अपक्ष शिवसेनेच्या बाजूचे असून लोकभारती आणि शेकापचा प्रत्येकी एक सदस्य आहे. तर, भाजपकडे २२ सदस्य असून दोन अपक्ष भाजपच्या बाजूने आहेत.