चीननंतर भारतातील मुले लठ्ठ; १४.४ लाखमुलांचे वजन अधिक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 03:55 AM2017-11-26T03:55:39+5:302017-11-26T03:57:57+5:30
चीननंतर जागतिक स्तरावर भारतातील मुले स्थूलतेच्या समस्येने ग्रस्त असल्याचे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासानुसार, देशातील १४.४ लाखमुलांचे वजन अधिक असल्याचे आढळून आले आहे.
मुंबई : चीननंतर जागतिक स्तरावर भारतातील मुले स्थूलतेच्या समस्येने ग्रस्त असल्याचे एका आंतरराष्ट्रीय अभ्यासातून समोर आले आहे. या अभ्यासानुसार, देशातील १४.४ लाख मुलांचे वजन अधिक असल्याचे आढळून आले आहे. तर जागतिक स्तरावर दोन अब्जपेक्षा अधिक मुले आणि प्रौढांना जादा वजन किंवा लठ्ठपणाने ग्रासले आहे. या वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येमुळे आयुर्मर्यादा कमी झाल्याचे दिसून आले आहे.
या अभ्यासानुसार, चीनमध्ये १५.३ लाख मुलांना, भारतात १४.४ लाख लहानग्यांना स्थूलतेची समस्या आहे. तर भारतात मधुमेहाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. आपल्याकडे २८ ते ३५ बॉडी मास इंडेक्स असलेले पाच कोटींहून अधिक लोक लठ्ठपणासोबतच टाइप - २ च्या मधुमेहाशी लढत आहेत. अभ्यासाविषयी माहिती देताना डॉ. नागेश सोमण यांनी सांगितले की, वाढत्या लठ्ठपणामुळे कर्करोग, हृदयरोग, मधुमेहाचा धोका अधिक संभवतो.
लठ्ठपणा अर्थात ओव्हरवेट किंवा ओबेसिटी हा केवळ पाश्चिमात्यांचा रोग राहिलेला नाही. भारतासारखा विकसनशील देशही या रोगाच्या विळख्यात येऊ लागला आहे. या अभ्यासानुसार, भारतीयांमध्ये दिवसेंदिवस लठ्ठपणा वाढत असून, एक तृतीयांश प्रौढ भारतीयांचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे. गेल्या काही वर्षांत मेट्रोपॉलिटन जीवनशैली, कामाचा ताण आणि परिणामी आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे लठ्ठपणात वाढ होत आहे. पूर्वी देशातील मोठ्या प्रमाणात नागरिक मूलभूत गरजेची पूर्तता होत नसल्याने येथे आवश्यकतेपेक्षा कमी वजन असणाºया लोकांची संख्या जास्त होती, असेही निरीक्षण या अभ्यासात नोंदविले आहे.