मुंबई : काँग्रेस नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश करताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तोंडभरून स्तुती केली. मोदी यांनी शंभर दिवसात कलम ३७० हटविण्यापासून अनेक धाडसी निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये आल्याने इंदापुरात आपला विजय निश्चित झाल्याचे सांगत चंद्रकांत पाटील यांनी एकप्रकारे त्यांची उमेदवारीच घोषित केली. आपण मित्र व शत्रू बदलू शकतो पण शेजारी बदलू शकत नाही, या शब्दात ज्यांच्याशी परंपरागत संघर्ष केला त्या पवार घराण्याचे नाव न घेता हर्षवर्धन पाटील यांनी ‘आमची भौगोलिक परिस्थिती पाहता आम्हाला यापुढे तुमच्याकडून विशेष मदत लागेल, असे साकडे मुख्यमंत्र्यांना घातले. त्यावर, इंदापूरचा पाणीप्रश्न असो की आणखी प्रश्न असतील ते सगळे कालबद्ध पद्धतीने सोडविले जातील, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
सर्वांना सोबत घेऊन चालण्याची पाटील यांची भूमिका राहिली असून ते सांसदीय कामकाज मंत्री असताना आपण तो अनुभव घेतला आहे. त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांचे पाटील हे बुलेटप्रुफ जॅकेट होते. त्यावेळी आम्ही विरोधक म्हणून ज्या बुलेट सरकारवर चालवायचो त्या ते सरकारला न लागू देत आम्हाला परत आणून देत असत, असे मुख्यमंत्री म्हणाले.
चंद्रकांत पाटील म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या आधी हर्षवर्धन पाटील यांनी भाजपमध्ये यावे असे प्रयत्न आम्ही केले. तसे झाले असते तर बारामतीत सुप्रिया सुळे यांचा पराभव झालेला दिसला असता. वर्षानुवर्षे त्यांनी जो विचार जपला तो लगेच सोडणे शक्य नव्हते. शिवाय पाटील हुशार आहेत. लोकसभेत भाजप जिंकेल की नाही याबाबत शंका असल्याने ते आज पक्षात येत आहेत, असा चिमटा चंद्रकांत पाटील यांनी काढला.
हर्षवर्धन म्हणाले, मी विनाअट भाजपमध्ये आलो आहोत. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याने पाच वर्षांत मोठी प्रगती केली आहे. त्यांनी राज्याला कणखर नेतृत्व दिले आहे. मी १९५२ पासून एका राजकीय संस्कारात वाढलो. आज तत्वानं राजकारण करायचे तर भाजपशिवाय पर्याय नाही असे वाटल्याने मी आजचा निर्णय घेतला.हर्षवर्धन यांना जायचंच होतं - अजित पवारसोमेश्वरनगर (जि. पुणे): हर्षवर्धन पाटील खोटे आरोप करत आहेत. आम्ही त्यांना ५० ते ५५ फोन केले पण ते भेटले नाहीत. पक्षश्रेष्ठी जो निर्णय घेतील तो मान्य असेल असा शब्द दिला होता. पण त्यांचं आधीच ठरलं होतं. त्यांना जायचंच होतं, असा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.भांडण दिराशी, नवरा का सोडताय? - सुप्रिया सुळेऔरंगाबाद : भांडण दिराशी असताना, नवरा का सोडताय? असा थेट सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी हर्षवर्धन पाटील यांना केला. त्या म्हणाल्या, आघाडीत इंदापूरच्या जागेची चर्चाच नसताना त्यांनी भाजप प्रवेशाचा निर्णय कसा घेतला? बरं दुसरं म्हणजे राष्ट्रवादीने त्यांना कधी नाही म्हटलेलं नाही. उलट जिल्हा परिषदेत त्यांच्या मुलीच्या बाजूने आम्ही त्यावेळी निर्णय घेतला. त्यांच्याशी संपर्क साधण्याचा मी स्वत: प्रयत्न करीत आहे. पण त्यांचा मोबाईल नॉट रिचेबलच आहे.