मुंबई : रस्त्यांवरील खड्ड्यांच्या मुद्द्यावर अलीकडे काँग्रेसने पालिका प्रशासनाला लक्ष्य केले होते. काँग्रेसपाठोपाठ आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही आक्रमक पवित्रा घेतला आहे. मुंबईच्या रस्त्यावर पडलेले खड्डे आणि रस्त्यांची दुरुस्ती आठवडाभरात त्वरित न केल्यास पाठपुरावा आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादीने दिला आहे.
राज्यात महाविकास आघाडी असली तरी मुंबई महापालिकेत तिन्ही पक्ष तांत्रिकदृष्ट्या एकमेकांच्या विरोधात आहेत. शिवाय, आगामी पालिका निवडणुकांतील आघाडीबाबत कसलीच स्पष्टता नाही. त्यामुळे पालिकेतील कारभारावर टीका करताना थेट शिवसेनेवर बोट ठेवण्यापेक्षा प्रशासनावर टीका करण्याचा मध्यममार्ग दोन्ही काँग्रेसनी स्वीकारल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते अमोल मातेले यांच्या शिष्टमंडळाने अलीकडेच पालिकेचे रस्ते विभागाचे प्रमुख अभियंते राजन तळकर यांची भेट घेऊन निवेदन दिले. पावसाळ्यात मुंबईच्या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालकांना तासन्तास वाहतूककोंडीत अडकून पडावे लागत आहे. त्यात इंधन दरवाढीचा मनस्ताप आहेच. कोरोना काळात आधीच आर्थिक परिस्थिती बिकट झालेल्या मुंबईकरांना वाहतूककोंडीच्या निमित्ताने नाहक भुर्दंड सोसावा लागत आहे.
खड्डे आणि खराब रस्त्यांमुळे मुंबईकर प्रचंड तणावाखाली वावरत आहेत. याचा मोठा उद्रेक होऊन मुंबईकर रस्त्यावर उतरतील, असा इशारा यावेळी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने दिला. पालिकेच्या अर्थसंकल्पात रस्तेकामासाठी १८०० कोटींची तरतूद असतानाही मुंबईचे रस्ते खड्ड्यांत का, असा प्रश्न अमोल मातेले यांनी महापालिकेला दिलेल्या निवेदनाद्वारे उपस्थित केला होता.
खड्डे बुजवा, रस्ते दुरुस्ती करा
पालिका अधिकाऱ्यांसोबतच राष्ट्रवादीच्या या शिष्टमंडळाने मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण अर्थात एमएमआरडीएलाही आपल्या अखत्यारित येणारे खड्डे बुजवा, रस्ते दुरुस्ती करा, अशा आशयाचे निवेदन दिले आहे. मुंबईतील काही रस्ते हे एमएमआरडीएच्या अंतर्गत येत असल्याने एमएआरडीच्या सहआयुक्त राहुल कर्डिले यांना निवेदन सादर करत खड्ड्यांचा निकाल लावावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.