काँग्रेसपाठोपाठ मुंबई भाजपामध्येही अंतर्गत धुसफूस, आशिष शेलारांनी पाच मिनिटांमध्ये व्यासपीठ सोडले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2021 06:46 PM2021-11-22T18:46:45+5:302021-11-22T18:47:24+5:30
Mumbai Politics News: मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या एका आंदोलनामध्ये BJP मधील ही धुसफूस प्रकर्षाने दिसून आली. या आंदोलनादरम्यान, भाजपाचे मुंबईतील प्रमुख नेते असलेल्या Ashish Shelar यांनी अवघ्या पाच मिनिटांत आंदोलनाच्या व्यासपीठावरून काढता पाय घेतला.
मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात महत्त्वाची असलेली मुंबई महानगरपालिकेची निवडणूक काही महिन्यांवर आली आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच प्रमुख पक्ष कंबर कसून तयार झाले आहेत. मात्र या निवडणुकीत स्वबळावर लढण्याची तयारी करत असलेल्या काँग्रेसमध्ये वाद उफाळून आला होता. झिशान सिद्धिकी आणि भाई जगताप यांच्यातील वाद थेट काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधींपर्यंत पोहोचला होता. दरम्यान, आता काँग्रेस पाठोपाठ भाजपामध्येही अंतर्गत धुसफूस सुरू झाल्याची चर्चा आहे.
एकेकाळचा मित्र आणि आता कट्टर प्रतिस्पर्धी बनलेल्या शिवसेनेची मक्तेदारी मोडून काढून मुंबई महानगरपालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपाने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी भाजपाकडून मुंबईमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. दरम्यान, मुंबईतील वांद्रे येथे झालेल्या एका आंदोलनामध्ये भाजपामधील ही धुसफूस प्रकर्षाने दिसून आली. या आंदोलनादरम्यान, भाजपाचे मुंबईतील प्रमुख नेते असलेल्या आशिष शेलार यांनी अवघ्या पाच मिनिटांत आंदोलनाच्या व्यासपीठावरून काढता पाय घेतला. तसेच ते उपस्थित कार्यकर्त्यांनाही संबोधित करण्यासाठी थांबले नाहीत.
राज्यातीला काही शहरांमध्ये झालेल्या जातीय दंगलीच्या निषेधार्थ भाजपाने आज विविध ठिकाणी आंदोलन केले. त्याचप्रमाणे मुंबईतील वांद्रे येथे हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. त्या आंदोलनामध्ये भाजपाचे मुंबईतील प्रमुख नेते उपस्थित होते. मात्र आशिष शेलार यांनी तिथून थोड्याच वेळात परतीची वाट धरल्याने तर्कवितर्कांना उधाण आले आहे. गेल्या निवडणुकीत मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी आशिष शेलार यांच्याकडे होती. यावेळी ती अतुल भातखळकर यांच्याकडे देण्यात आली आहे. त्यामुळे आशिष शेलार हे नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे.