Maharashtra Politics: राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या विधानामुळे मोठा वाद निर्माण झाला. महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिंदे गटातील आमदारांनीही याविरोधात तीव्र प्रतिक्रिया देत निषेध नोंदवला. याशिवाय संभाजीराजे छत्रपती, उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांनीही तीव्र शब्दांत टीका केली. मात्र, या गदारोळानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांवर स्तुतिसुमने उधळली आहेत.
एका कार्यक्रमामध्ये बोलताना भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवरायांच्या कार्याचा गौरव करत, छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप यांच्या प्रयत्नामुळे भारत जगात स्वाभिमानाने उभा आहे. भारताची संस्कृती आजरामर आहे, असेही ते म्हणाले. भारतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस यांच्यासारख्या माणसांनी देशाला समृद्ध केले आहे, असेही कोश्यारी यांनी नमूद केले.
भारत स्वाभिमानाने जगात उभा आहे
भारतातील क्रांतीकारी लोकांमुळेच भारत आज स्वाभिमानाने जगात उभा आहे. या क्रांतिकारी लोकांमुळे देशाची संस्कृती जगभरात अमर असल्याचेही मत कोश्यारी यांनी व्यक्त केले. तत्पूर्वी, भगतसिंह कोश्यारी यांनी काही दिवसांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज आणि नितीन गडकरी, शरद पवार यांची तुलना केली होती. त्यामुळे राज्यात प्रचंड वाद उफाळून आला होता. शिवसेने काँग्रेस, राष्टवादी पक्षांकडून राज्यपाल आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला होता.
दरम्यान, राज्यपाल कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल काढलेल्या उद्गारांचा संपूर्ण देशभरात तीव्र भावना आहेत. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या अस्मितेचा प्रश्न आहे. वादग्रस्त वक्तव्ये करण्याची ही पहिली वेळ नाही, राज्यपालांनी यापूर्वीही अनेक वादग्रस्त विधाने केलेली आहेत. म्हणून आता लोकांचा संयम सुटत चालला आहे. राज्याच्या राज्यपालांची तातडीने राज्याबाहेर बदली करावी. नवीन राज्यपाल राज्यात तातडीने नियुक्त करावा. छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्रात अशी वादग्रस्त विधाने करणे योग्य नाही. महाराष्ट्राचा अवमान आम्ही कधीही सहन करणार नाही, असे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी म्हटले होते.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"