कोरोनानंतर आता झिका व्हायरसचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2021 04:06 AM2021-07-20T04:06:26+5:302021-07-20T04:06:26+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना व्हायरसचा गेले दीड वर्ष सामना करणाऱ्या मुंबईला आता साथीच्या आजारांचा धोका आहे. गेले ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना व्हायरसचा गेले दीड वर्ष सामना करणाऱ्या मुंबईला आता साथीच्या आजारांचा धोका आहे. गेले चार दिवस कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने साथीच्या आजारांना आमंत्रण दिले आहे. मलेरिया, डेंग्यू आणि लेप्टोने ग्रस्त रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. अद्याप झिका व्हायरसची लागण झालेला एकही रुग्ण मुंबईत सापडलेला नाही.
मात्र, मलेरिया आणि डेंग्यूसमानच लक्षणे असल्याने या आजाराचे निदान होणे अवघड ठरते. त्यामुळे सावधगिरी म्हणून डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करणे, महापालिकेच्या मोठ्या आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये साथीच्या रुग्णांसाठी खाटा वाढवणे आदी उपाययोजना पालिका प्रशासनाने सुरू केल्या आहेत.
कशामुळे होतो?
एडिस डास चावल्याने झिका व्हायरस होतो. १९४७ मध्ये आफ्रिकेमध्ये सर्वप्रथम झिका व्हायरस पसरला होता. मलेरिया, डेंग्यूप्रमाणेच हा आजार असल्याने त्याचे निदान होण्यास बराच वेळ विलंब होतो. मात्र बाधित रुग्णांपैकी अपवादात्मक परिस्थितीत रुग्णाचा मृत्यू होण्याचे प्रमाण एक टक्का आहे.
झिका व्हायरसची लक्षणे काय?
* डेंग्यूप्रमाणेच ताप येणे, सर्दी, डोकेदुखी.
* एका आठवड्यापेक्षा अधिक काळ अंगावर चट्टे उठणे.
* काही जणांमध्ये डोळे येणे, सांधे दुखणे.
उपाययोजना काय?
* झिका व्हायरसचा प्रसार करणारे एडिस डास सकाळच्या वेळेत सक्रिय असतात. त्यामुळे असे डास चावणार नाहीत याची काळजी घ्यावी. घरामध्ये पाणी अधिक काळ साठवून ठेवू नये.
* जून २०२१ मध्ये पालिकेच्या कीटकनाशक विभागाने ७२ हजार ८३५ परिसरात पाहणी करून ३०६ ठिकाणी आढळलेली एडिस डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट केली. तसेच तीन हजार ७५१ इमारतींमध्ये धूरफवारणी केली.
कोट :
आतापर्यंत झिका व्हायरसचा एकही रुग्ण मुंबईत सापडलेला नाही. तरीही खबरदारी म्हणून पावसाळी आजारांच्या रुग्णांसाठी खाटा राखून ठेवण्यात आल्या आहेत. तसेच पालिकेच्या मोठ्या आणि उपनगरीय रुग्णालयांमध्ये तसेच दवाखान्यांमध्ये विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे.
- सुरेश काकाणी (अतिरिक्त महापालिका आयुक्त)