कोरोनानंतर लालपरीने ओलांडला ५७ लाख प्रवाशांचा टप्पा;एसटी सुसाट; उत्पन्नातही झाली भरघोस वाढ

By नितीन जगताप | Published: May 10, 2023 06:54 AM2023-05-10T06:54:33+5:302023-05-10T06:55:56+5:30

कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने मोठा फटका बसलेल्या एसटीने २०२० नंतर पहिल्यांदाच ५७ लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला आहे.

After Corona, st bus crossed the milestone of 57 lakh passengers | कोरोनानंतर लालपरीने ओलांडला ५७ लाख प्रवाशांचा टप्पा;एसटी सुसाट; उत्पन्नातही झाली भरघोस वाढ

कोरोनानंतर लालपरीने ओलांडला ५७ लाख प्रवाशांचा टप्पा;एसटी सुसाट; उत्पन्नातही झाली भरघोस वाढ

googlenewsNext

नितीन जगताप

मुंबई : कोरोना काळात प्रवासी संख्या घटल्याने मोठा फटका बसलेल्या एसटीने २०२० नंतर पहिल्यांदाच ५७ लाख प्रवासी संख्येचा टप्पा ओलांडला आहे. गेली ७५ वर्षे अखंड सेवा देणाऱ्या एसटीची चाके कोरोनामुळे थांबली होती. संपूर्ण महाराष्ट्रात एसटी बस बंद होत्या. नंतर हळूहळू एसटी पूर्वपदावर येत असताना संपामुळे पुन्हा सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाली होती. त्यातून प्रवाशांनी एसटीकडे पाठ फिरविली होती.

सर्व कटू प्रसंगांना मागे सोडत त्यानंतर नव्या उमेदीने एसटीने पुन्हा सुरुवात केली. २०२२ च्या जानेवारी महिन्यात दररोज सरासरी फक्त ३ लाख प्रवाशांची ने-आण करणारी एसटी आता (मे २०२३) तब्बल सरासरी ५७ लाख प्रवाशांची ने-आण करीत आहे. यासाठी एसटीचे कर्मचारी, अधिकारी यांचे अथक प्रयत्न, प्रवाशांचा एसटीवरील दृढ विश्वास कारणीभूत आहे.

शालेय मुलांना उन्हाळ्याची सुटी आहे. लग्नसराई सुरू आहे. प्रवासी एसटी महामंडळावर चांगला विश्वास दाखवत आहेत. महामंडळानेही जास्तीत जास्त गाड्या रस्त्यावर उतरविल्या आहेत. त्यामुळे उत्पन्नात भरघोस वाढ झाली आहे. ८ मे रोजी विक्रमी २९ कोटींहून अधिक उत्पन्न मिळाले आहे.

- शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एसटी महामंडळ

या निर्णयांनी प्रवासी संख्येत वाढ 

महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या दोन क्रांतिकारी निर्णयामुळे एसटीच्या प्रवासी संख्येत विक्रमी वाढ झाली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठांना एसटीच्या सर्व प्रकारच्या बसमधून मोफत प्रवास आणि महिला सन्मान योजनेंतर्गत महिलांना प्रवासात तिकिटामध्ये ५० टक्के सवलत लागू करण्यात आली.

त्यामुळे एसटीची प्रवासी संख्या वाढत आहे. बस गाड्यांची कमतरता, वाहनांच्या सुट्या भागांचा अभाव, डिझेलचे वाढते दर, जुन्या झालेल्या बस, नादुरुस्त बसचे वाढते प्रमाण अशा अनेक अडचणींवर मात करत एसटी आता वाटचाल करत आहे.

Web Title: After Corona, st bus crossed the milestone of 57 lakh passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.