संशोधनातील निरीक्षण; पुन्हा संसर्ग हाेण्याचा धाेका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : देशासह राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा विळखा घट्ट होत आहे. दिवसागणिक यंत्रणांवरील ताण वाढत असतानाच आता कोरोनाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. एका नव्या संशोधन अभ्यास अहवालानुसार, कोरोनानंतर व्यक्तीच्या शरारीतील नैसर्गिक रोगप्रतिकारशक्ती कमी होत आहे. यामुळे पुन्हा संसर्ग होण्याचा धोकाही संभवत असल्याचे निरीक्षण वैद्यकीय तज्ज्ञांनी मांडले आहे.
इन्स्टिट्यूट ऑफ जिनॉमिक्स ॲण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी (आयजीआयबी) च्या अभ्यासानुसार आपली नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता ही कोरोनाविरोधात काम करते. पण काही जणांच्या बाबतीत म्हणजे सरासरी २० ते ३० टक्के जणांच्या बाबतीत ही नैसर्गिक क्षमता काम करण्याची प्रक्रिया थांबते. डॉ. अनुराग अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झाल्यानंतर शरीरातील कोरोनाचा विषाणू नष्ट करण्यासाठी रोगप्रतिकारशक्ती ही २० ते ३० टक्के रुग्णांच्या बाबतीत कमी झाल्याचे अभ्यासात आढळले आहे. देशासह प्रमुख राज्य आणि शहरातील कोरोनाच्या संसर्गाचा वैज्ञानिक पद्धतीने अभ्यास करणे गरजेचे आहे. नैसर्गिक किंवा कृत्रिम रोगप्रतिकारशक्तीचा अभ्यास करून त्यावरून संसर्ग नियंत्रणासाठी संशोधन होणे आवश्यक आहे, असेही डॉ. अग्रवाल यांनी नमूद केले.
* नवा म्यूटंट अधिक धाेकादायक!
विषाणूतज्ज्ञ डॉ. नागेश लोहिया यांनी सांगितले की, राज्यातील कोरोनाचा नवा म्यूटंट (उत्परिवर्तन) धोकादायक असल्याचे दिसून येत आहे. ज्या पद्धतीने रुग्ण निदान होत आहे, त्यावरून संसर्गाची तीव्रता लक्षात येते. अशा स्थितीत विषाणूचा अभ्यास व संशोधन होणे गरजेचे आहे. आपल्याकडे याविषयी फारसे गांभीर्याने पाहिले जात नाही. मुळात अशा स्वरूपाचे संशोधन झाल्यास काेराेनाविराेधात लढण्यासाठी यंत्रणांना वैद्यकीय तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेणे सोपे जाईल.
..........................................