मुंंबई : भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी सुरू असताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्याशी बैठकीतूनच चर्चा करण्यात आली आणि सरकार स्थापन करायचे नाही अशी भूमिका कोअर कमिटीने घेतली असल्याचे त्यांना सांगण्यात आले. त्यावर, लगेच आपला निर्णय योग्य आहे, असे अमित शहा यांनी सांगितले व काहीच मिनिटात फडणवीस व इतर भाजप नेते राजभवनावर राज्यपालांना भेटायला गेले.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी राज्यपालांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना एक वाक्य उच्चारले ते बारकाईने बघितले तर ‘ सध्या आम्ही सरकार बनविणार नाही असे राज्यपालांना सांगितले’ असे होते. यावरून भविष्यात विशिष्ट परिस्थिती उद्भवल्यानंतर भाजप सरकार स्थापन करू शकेल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले. भाजपने एका ठरविलेल्या रणनीती अंतर्गत सरकार स्थापन न करण्याचा निर्णय घेतला.भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि विधानसभेसाठी महाराष्ट्राचे प्रभारी भूपेंद्र यादव आज कोअर कमिटीच्या दुसऱ्या बैठकीला हजर होते. मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, पंकजा मुंडे हे नेतेदेखील होते. सध्याच्या परिस्थितीत शिवसेनेसमोर हात पसरू नका, गेले पंधरा दिवस त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या नेतृत्वावर आणि पक्षावर आरोप केले आहेत ते पाहता आता शिवसेनेच्या दाढीला सत्तेसाठी हात लावत राहिलो तर पक्षात नाराजी पसरेल. मुख्यमंत्रिपदासह आपल्या इतर अटी, शर्र्तींवर येत असतील तर पुढे पाहू, अशी तीव्र भावना कोअर कमिटीतील सर्वांनीच व्यक्त केली आणि ती अमित शहा यांना कळविण्यात आली.‘सध्या’ सरकार स्थापन करणार नाही, असे म्हणणारा भाजप नजीकच्या भविष्यात काय करेल या बाबत वेगवेगळे तर्क दिले जात आहेत. शिवसेनेला राष्ट्रवादी पाठिंबा देईल का, काँग्रेस सत्तेत सहभागी होईल का वा बाहेरून पाठिंबा देईल, या प्रश्नांची उत्तरे नजीकच्या काळात मिळणार आहेत. राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेने सरकार स्थापन केले तर भाजप विरोधी पक्षात बसेल. दोघांनीही किंवा एकाने सरकारसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला नाही तर पेचप्रसंग निर्माण होईल. अशावेळी सेनेला भाजपसोबत जाण्याचा गांभीर्याने विचार करावा लागेल पण त्या परिस्थितीत पाच वर्षांसाठीचे मुख्यमंत्रिपद हे भाजपकडे जाईल.>काँग्रेस आमदारांच्या भाजप संपर्कातकाँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाला स्वत:ची तात्विक भूमिका टिकविण्यासाठी सेनेशी संग करणे पसंत नाही. अत्यंत विश्वसनीय सूत्रांनी सांगितले की, भाजप हा काँग्रेसच्या काही आमदारांच्या संपर्कात आहे. फडणवीस यांचे नेतृत्व त्यांना अधिक विश्वासार्ह वाटते. भाजपसोबत का जाऊ नये, असाही मतप्रवाह आहे.
महाराष्ट्र निवडणूक 2019: अमित शहांशी चर्चेनंतर झाला सत्ता स्थापन न करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2019 5:45 AM