Join us

सुरक्षा वेळेसाठी मुहूर्त दिवाळीनंतर

By admin | Published: October 31, 2015 12:43 AM

चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या एक युवतीच्या विनयभंगाच्या घटनेनंतर लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षा वेळेत जीआरपीकडून

मुंबई : चर्चगेटला जाणाऱ्या लोकलमध्ये रात्रीच्या सुमारास झालेल्या एक युवतीच्या विनयभंगाच्या घटनेनंतर लोकलच्या महिला डब्यातून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षा वेळेत जीआरपीकडून (गव्हर्नमेंट रेल्वे पोलीस) बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बदलाला आता दिवाळीनंतरचा मुहूर्त देण्यात आला आहे. लोकलमधून प्रवास करताना पहाटेच्या किंवा रात्रीच्या प्रवासात महिला प्रवाशांना छेडछाड, विनयभंग, अश्लील हावभाव तसेच चोरीच्या उद्देशाने मारहाणीच्या प्रसंगांना सामोरे जावे लागत आहे. आॅगस्ट महिन्यात चर्चगेट लोकलमधून प्रवास करणाऱ्या युवतीचा रात्री सव्वाअकराच्या सुमारास एका तरुणाने विनयभंग केला होता. यात युवतीला मारहाणही करण्यात आली. या घटनेनंतर रात्रीचा प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला. महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नेमकी कोणती उपाययोजना केली पाहिजे यासाठी एक पोलीस उपायुक्त आणि एक साहाय्यक पोलीस आयुक्त यांची समिती नेमण्यात आली. त्यांच्याकडून पोलीस आयुक्त (लोहमार्ग) मधुकर पाण्डेय यांना अहवाल सादर करण्यात आला होता. यात महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी काही उपाय सुचविण्यात आले होते. महत्त्वाची बाब म्हणजे महिला डब्यात रात्रीच्या सुरक्षा वेळेत बदल करण्याचे सुचविण्यात आले. सध्या सरसकट रात्री साडेआठ ते सकाळी सहा वाजेपर्यंत महिला डब्यात सुरक्षा पुरविली जाते. यात बदल करताना सीएसटी आणि चर्चगेटहून रात्री साडेनऊपासून सुटणाऱ्या लोकलच्या महिला डब्यात सुरक्षा व्यवस्था देण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासाठी प्रवासी संघटना आणि सामाजिक संस्थांशी बोलून यावर निर्णय घेण्यात येणार होता. याबाबत जीआरपी आयुक्त मधुकर पाण्डेय यांनी सांगितले की, महिला डब्यातील सुरक्षा व्यवस्थेत बदल केले जाणार आहेत. सीएसटी आणि चर्चगेटहून सुटणाऱ्या गाड्यांमध्ये रात्री साडेनऊपासून बदल होतील.