डॉक्टरच्या इंजेक्शननंतर रुग्ण अत्यवस्थ; कांदिवलीच्या श्रेया क्लिनिकमधील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2018 12:01 AM2018-06-03T00:01:03+5:302018-06-03T00:01:03+5:30
किरकोळ तापावर स्थानिक डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शननंतर एका २५ वर्षीय तरुणाची प्रकृती बिघडली. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देत, उपचाराचा सर्व खर्च करण्याचे संबंधित डॉक्टरने कबूल केले.
- गौरी टेंबकर-कलगुटकर
मुंबई : किरकोळ तापावर स्थानिक डॉक्टरने दिलेल्या इंजेक्शननंतर एका २५ वर्षीय तरुणाची प्रकृती बिघडली. त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला देत, उपचाराचा सर्व खर्च करण्याचे संबंधित डॉक्टरने कबूल केले. त्यानंतर मात्र त्याने हात वर केले, तसेच खासगी रुग्णालयातील त्याच्या उपचाराचे पैसे न भरताच, नायर रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिल्याचा आरोप त्याच्या नातेवाइकांनी केला आहे.
अजय चौहान असे या तरुणाचे नाव असून, त्याचे मेव्हणे अर्जुन चौहान यांनी सांगितले की, खासगी कंपनीत सुपरवायझर म्हणून काम करीत असलेल्या अजयला २५ मे रोजी ताप येऊन अस्वस्थ वाटू लागल्याने, तो कांदिवली पश्चिमच्या गणेशनगर परिसरातील ‘श्रेया क्लिनिक’मध्ये डॉ. अरविंदसिंग चौहान यांच्याकडे गेला. त्यांनी दोन दिवस त्याला एकाच जागी इंजेक्शन दिली.
मात्र, तब्येत सुधारण्याऐवजी आणखी बिघडली. थकव्यामुळे त्याला चालता येत नसल्याचे डॉ. चौहान यांना सांगितल्यानंतर, त्यांनी ‘याबाबत काही तक्रार करू नको, मी त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचाराचा खर्च देईन,’ असे सांगत, त्याला चारकोप येथील आॅस्कर रुग्णालयात पाठविले. मात्र, तिथे त्याला अतिदक्षता विभागात दाखल व्हावे लागेल.
सुरुवातीला किमान ५० हजार रुपये जमा करण्यास सांगण्यात आले. याबाबत डॉ. चौहान यांना कळविल्यावर त्यांनी आपण काही मदत करू शकत नसल्याचे सांगत दुर्लक्ष केले. त्यामुळे नातेवाइकांनी अजयला नायर रुग्णालयात अॅडमिट केले. त्याची प्रकृती अद्याप गंभीर असल्याचे अर्जुन यांनी सांगितले.
दरम्यान, याबाबत डॉ. चौहान यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांनी काही प्रतिसाद दिला नाही, तसेच आॅस्कर रुग्णालयातील डॉ. नितीन पवार यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनीही फोन उचलला नाही.
झोपडपट्ट्यांमध्ये बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट वाढला आहे. त्यामुळे संबंधित रुग्णाला जो त्रास झाला आहे, त्याबाबत त्यांनी स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांकडे लेखी तक्रार करावी. त्यानंतर, आम्ही संबंधित डॉक्टरची पदवी तपासून त्याबाबत योग्य ती कारवाई करू.
- डॉ. दक्षा शाह (आरोग्य अधिकारी, आर दक्षिण)