दसरा मेळाव्यानंतर उद्धव ठाकरे कुटुंबियांसह बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणी; पुतळ्याला केले अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2021 10:19 PM2021-10-15T22:19:31+5:302021-10-15T22:27:44+5:30
दसरा मेळाव्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसह स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याला अभिवादन केले
Shivsena Dasara Melava 2021: मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी (CM Uddhav Thackeray) दसरा मेळाव्यातून भारतीय जनता पक्षाचा समाचार घेतला आहे. सध्या केंद्र सरकारकडून छापा काट्याचा खेळ सुरू आहे. छापा टाकायचा आणि काटा काढायचा अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी ईडी आणि आयकर विभागाच्या कारवायांवर मोजक्या शब्दांत भाष्य केलं. सरकार स्थापन झाल्यापासून ते पाडण्याची भाषा केली जात आहे. हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, असं आव्हान ठाकरेंनी भाजपला दिलं.
शिवसेनेचा दसरा मेळावा यंदा मुंबईतील षण्मुखानंद हॉलमध्ये भव्य प्रमाणावर साजरा करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री म्हणून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रथमच शिवसैनिकांना संबोधित केले. दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित केल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुटुंबियांसमवेत शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून आशीर्वाद घेतले.
मंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील ट्विटरद्वारे दसरा मेळाव्यानंतर माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले, असं ट्विट केलं आहे.
दसरा मेळाव्यानंतर माझे आजोबा हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून आशीर्वाद घेतले. pic.twitter.com/ZXHJkDPS0c
— Aaditya Thackeray (@AUThackeray) October 15, 2021
तत्पूर्वी, "मला काही मुख्यमंत्री व्हायची हौस नव्हतीच. तुम्ही दिलेला शब्द पाळला नाही आणि मला वडिलांना दिलेलं वचन पाळायचं होतं, म्हणून माझ्यावर प्रशासनात यायची वेळ आली. पुत्र कर्तव्य म्हणून मी राजकारणात आलो. तुम्ही जर त्यावेळी शब्द पाळला असता आणि शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ दिला असता तर मी राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. तुमचाही मुख्यमंत्री नक्कीच पाहायला मिळाला असता. पण नशीब नावाचीही एक गोष्ट असते जी तुमच्या बाजूनं नव्हती", असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
अजून बाळासाहेबांना दिलेला शब्द पूर्ण झालेला नाही- उद्धव ठाकरे
तुम्ही (देवेंद्र फडणवीस) दिलेला शब्द पाळला असता तर आजही तुम्हीच मुख्यमंत्री असता, असं उद्धव ठाकरे म्हणाले. तुम्ही शब्द पाळला नाही. पण मी माझ्या वडिलांना दिलेलं वचन पाळलं. त्यामुळेच मी मुख्यमंत्रिपद स्वीकारलं. पण मी बाळासाहेबांना दिलेलं वचन अजूनही पूर्ण झालेलं नाही. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन असा शब्द मी बाळासाहेबांना दिलेला होता. तो अद्याप पूर्ण करायचा आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदी बसवायचं आहे. बाळासाहेबांना दिलेला शब्द मी नक्कीच पूर्ण करेन, असं मुख्यमंत्री म्हणाले.