- सीमा महांगडे
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलातील जागेत गुरुवारी सकाळी मद्याच्या बाटल्यांचा खच पाहायला मिळाला. याचबरोबर प्लास्टिकचा कचराही मोठ्या प्रमाणावर साचल्याने विद्यापीठाची कचराकुंडी झाली का? अशी टीका होऊ लागली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासाठी मुंबई विद्यापीठाची मोकळी जागा बस पार्किंगसाठी घेण्यात आली होती. याला युवा सेना, छात्र भरती, राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यांनी विरोध केला होता. मात्र मुंबई महापालिकेकडून पत्र आल्याने जागा देण्यात आल्याची भूमिका विद्यापीठाने घेतली. त्याप्रमाणे बुधवारी झालेल्या सभेसाठी आलेल्या सर्व बसगाड्या विद्यापीठाच्या प्रांगणात पार्क करण्यात आल्या होत्या. याच ठिकाणी अनेकजण राहिलेही होते. यावेळी त्यांची जेवणाची तसेच अन्य सुविधा विद्यापीठाच्या प्रांगणात झाल्याने गुरुवारी सकाळी हे संकुल कचऱ्याने भरलेले दिसू लागले. विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे माजी सदस्य प्रदीप सावंत, राजन कोळंबेकर यांनी जाऊन पाहणी केली, तर सर्वत्र कचरा आणि मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. अनेक भागात शौच केल्याने दुर्गंधी पसरल्याचे सावंत यांनी सांगितले. आता हा सर्व कचरा गोळा करून हेलिपॅडवर टाकला जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
याशिवाय विद्यापीठाच्या कलिना संकुलातील बीकेसी दिशेचे गेट तुटले असल्याने विद्यापीठाचे मोठे नुकसान झाले आहे. हे गेट एक महिन्यांपूर्वी सामान्य वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते.