Join us

Anil Parab: ईडीची नोटीस येताच अनिल परब शिर्डीत साई बाबांच्या चरणी; चौकशीला मात्र दांडी? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2022 5:18 PM

Anil Parab: पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे अनिल परब ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती वकिलांनी दिली होती.

मुंबई: शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहनमंत्री अनिल परब (Anil Parab) यांना सक्तवसूली संचलनालयाने (ED) समन्स बजावले आहे. दापोली येथील साई रिसॉर्टशी संबंधित मनी लाँड्रिंग (Money laundering case) प्रकरणी सक्तवसूली संचालनालयाकडून पुन्हा एकदा समन्स बजावण्यात आले असून, चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. मात्र, अनिल परब शिर्डीत साई बाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी गेले आहेत. त्यामुळे ते चौकशीला हजर राहणार नाहीत, असे सांगितले जात आहे. 

अनिल परब यांच्यावतीने त्यांचे वकील किंवा पदाधिकारी ईडीसमोर उपस्थित होऊन त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देतील, अशी माहिती देण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिल परब त्यांचे वकील किंवा पदाधिकारी ईडीच्या कार्यालयात पाठवू शकतात. या आधीही अनिल परब कधीच प्रथमदर्शनी आले नाहीत. मागच्या वेळीही तिसऱ्या नोटीसनंतर अनिल परब ईडीच्या कार्यालयात आले होते. यापूर्वी ईडीने परब यांचे सहकारी सदानंद कदम आणि संजय कदम यांचे जबाब नोंदवले आहेत. 

अनिल परब यांची शिर्डीत साईबाबांच्या दरबारात हजेरी

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावली आहे. मात्र, अनिल परब यांनी शिर्डीत साईबाबांच्या दरबारात हजेरी लावली. अनिल परब हे साईबाबांच्या मध्यान्ह आरतीला उपस्थित होते. अनिल परब यांचा दौरा हा पूर्वनियोजित होता. आपल्या पूर्वनियोजित कार्यक्रमांमुळे ते ईडी चौकशीला हजर राहणार नसल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी दिली होती. तत्पूर्वी, अनिल परब यांच्या शासकीय तसेच खासगी निवासस्थाने, कार्यालयांसह मुंबई, पुणे आणि रत्नागिरीमध्ये ७ ठिकाणी यापूर्वी छापे टाकण्यात आले होते. मुरुड समुद्रकिनाऱ्यावरील साई रिसॉर्टवर ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला होता. 

दरम्यान, केंद्रीय तपास यंत्रणांकडून राज्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांना लक्ष्य केले जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. शिवसेनेचे काही मातब्बर नेतेही केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आहेत. मुंबई महापालिकेतील सत्ता कोणत्याही परिस्थितीत ताब्यात घ्यायची असा चंग भाजपने बांधला असताना दुसरीकडे शिवसेनेच्या मुंबईतील नेत्यांवर कारवाई सुरू झाली आहे. त्यामुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होत असल्याची चर्चा सुरू आहे. अनिल परब यांना ईडीने अटक केल्यास मुंबई महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याआधीच शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.   

टॅग्स :अनिल परबअंमलबजावणी संचालनालय