विधान परिषद उमेदवारीवरुन भाजपात नाराजी वाढली; खडसेंपाठोपाठ ‘या’ नेत्याचा पक्षाला घरचा आहेर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 07:44 AM2020-05-14T07:44:45+5:302020-05-14T07:48:39+5:30
तेव्हा खडसेंनी जावळेंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा टोला चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसेंना लगावला.
मुंबई – राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुकीवरुन भाजपातील पक्षातंर्गत नाराजी उफाळून आली आहे. विधान परिषदेच्या ४ जागांसाठी भाजपाकडून देण्यात आलेल्या उमेदवारांबद्दल ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी जाहीर नाराजी व्यक्त करत पक्षावर अनेक आरोप केले आहेत. ज्यांनी पक्षवाढीसाठी दिवसरात्र मेहनत घेतली. ज्यावेळी पक्षाला राज्यात कोणी विचारत नव्हतं तेव्हापासून पक्ष उभा केला त्यांना डावलून अलीकडेच पक्षात आलेल्यांना उमेदवारी देण्यात आली असा आरोप एकनाथ खडसेंनी केला.
तर खडसेंच्या या आरोपावर प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पक्षाने आजतागायत एकनाथ खडसेंना काय काय दिलं याची यादीच वाचून दाखवली. खडसेंना आतापर्यंत खूप काही दिलं, असा विचार करून केंद्रीय नेतृत्त्वानं त्यांना तिकीट नाकारलं असावं,आयुष्यभर खस्ता खाऊन इतरांना मोठं करण्याची आमची संस्कृती आहे. भाजपाच्या केंद्रीय संसदीय मंडळानं हरिभाऊ जावळे यांना लोकसभा निवडणुकीचं तिकीट जाहीर केलं होतं. मात्र ते तिकीट कापून खडसेंच्या सुनेला उमेदवारी देण्यात आली. तेव्हा खडसेंनी जावळेंच्या पाठीत खंजीर खुपसला नाही का? असा टोला एकनाथ खडसेंना लगावला.
तसेच विधान परिषदेसाठी नेते, इच्छुक उमेदवार समजून घेतील आणि शिकतील असं पाटील म्हणाले होते. त्यावरुन आता भाजपाचे नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनीही चंद्रकांत पाटील यांना टोला लगावला आहे. पंकजा मुंडे यांनी दोन दिवसात चांगला अभ्यास केला त्यामुळे रमेश कराड यांना उमेदवारी मिळाली. जो मला आणि इतरांना जमला नाही असा घरचा आहेर त्यांनी पक्षाला दिला आहे.
— Prof.Ram Shinde (@RamShindeMLA) May 13, 2020
विधान परिषदेच्या २१ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीसाठी भाजपाने माजी खासदार रणजीतसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर व शहराध्यक्ष प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र मंगळवारी अजित गोपछेडे यांना माघार घ्यायला लावून डमी अर्ज भरलेले रमेश कराड यांना उमेदवारी देण्यात आली.
कोण आहेत रमेश कराड?
रमेश कराड हे गोपीनाथ मुंडे यांचे खंदे समर्थक होते सध्या ते पंकजा मुंडे समर्थक आहे
२०१८ मध्ये रमेश कराड यांना विधान परिषदेचे तिकीट देण्यात आले होते पण ५ दिवसांत त्यांनी भाजपात पुन्हा प्रवेश केला