मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर आता भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी भेटीला पोहचले. रविवारी सकाळी शेलार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली. या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. अंधेरी पोटनिवडणुकीबाबत शेलारांनी राज ठाकरेंशी चर्चा केल्याची माहिती आहे.
अंधेरी पोटनिवडणुकीत भाजपाने मुरजी पटेल यांना उमेदवारी दिली आहे. याठिकाणी दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांना महाविकास आघाडीकडून उमेदवारी देण्यात आली आहे. या निवडणुकीत मुरजी पटेल ३० हजार मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास आशिष शेलारांनी व्यक्त केला होता. अंधेरी पोटनिवडणुकीत मनसेचेही मतदार आहेत. या निवडणुकीत कुठल्याही परिस्थितीत विजय मिळवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहेत. त्यामुळे राज ठाकरे-आशिष शेलार भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
शनिवारीच आरोग्याच्या मुद्द्यावरून मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या भेटीत आरोग्यासोबतच अंधेरी पोटनिवडणुकीत तुम्ही लक्ष घालावं अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडून राज ठाकरेंना करण्यात आली. आशिष शेलार यांच्यावर अंधेरी पोटनिवडणुकीची जबाबदारी आहे. त्यात शेलार आणि राज ठाकरेंची भेट झाल्याने या निवडणुकीत मनसे काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचे लक्ष आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या दृष्टीनेही शेलार यांनी राज ठाकरेंशी चर्चा केल्याचं सांगण्यात येते. अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि भाजपा यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. शिवसेनेतील बंडानंतर ही पहिली मोठी निवडणूक आहे. ऋतुजा लटके या मशाल चिन्हावर निवडणूक लढवत आहेत. तर भाजपाकडून मुरजी पटेल मैदानात आहेत.
अंधेरी पूर्व मतदारसंघात विजयी होणार - मुरजी पटेल भाजपा घाणेरडे राजकारण करत नाही. पुढेही करणार नाही. ऋतुजा लटकेंचा राजीनामा ही तांत्रिक बाब होती. त्याचा भाजपाशी संबंध नव्हता. भाजपा-बाळासाहेबांची शिवसेना-आरपीआय म्हणून मी प्रतिनिधित्व करणार आहे. विरोधकांचे आव्हान वाटत नाही. अपक्ष म्हणून मी ४८ हजार मते मी घेतली. आता तर भाजपासह युती पाठिंबा आहे. त्यामुळे ३० हजारांच्या मताधिक्याने निवडून येऊ. वेळोवेळी कोण मदत करतं हे अंधेरीतील जनतेला माहिती आहे. जनता विकासाला साथ देईल. गोरगरीब जनतेसाठी कोणी काम केले हे लोकांना माहिती आहे. अंधेरीच्या भविष्याची ही निवडणूक आहे. ६ तारखेला मुरजी पटेल आणि भाजपा काय आहे हे विरोधकांना कळेल असं सांगत मुरजी पटेल यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला.