Join us

लॉकडाऊन संपल्यानंतर पुन्हा वाढला दैनंदिन कचऱ्याचा भार, दररोज जमा होतोय साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 3:53 AM

 गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर दैनंदिन कचऱ्याचे प्रमाणही अडीच हजार मेट्रिक टन एवढे झाले. मात्र, पुनश्च हरिओमनंतर मुंबईतील सर्व व्यवहार पुन्हा पूर्ववत झाले. त्यामुळे कचऱ्याचा भार वाढला

- शेफाली परब-पंडितमुंबई :  गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत सुरू झाल्यानंतर, त्याचा अनुकूल परिणाम मुंबईतील वातावरणावर दिसून आला होता. वायू आणि ध्वनिप्रदूषणबरोबरच दैनंदिन कचऱ्याचे प्रमाणही अडीच हजार मेट्रिक टन एवढे झाले. मात्र, पुनश्च हरिओमनंतर मुंबईतील सर्व व्यवहार पुन्हा पूर्ववत झाले. त्यामुळे कचऱ्याचा भार वाढला असून, दररोज साडेसहा हजार मेट्रिक टन कचरा जमा होत आहे.२०१८ पर्यंत मुंबईतील कचऱ्याचा दररोजचा भार नऊ हजार मेट्रिक टनवर पोहोचला होता. मात्र, देवनार आणि कांजूर मार्ग हे पर्याय महापालिकेकडे आहेत. देवनारची क्षमता संपुष्टात आली आहे. त्यामुळे कचऱ्याचा भार कमी करण्यासाठी गेल्या दोन वर्षांत अनेक उपक्रम राबविले. फेरीवाल्यांसह सर्व व्यवहार पूर्ववत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २४ मार्च, २०२० पासून मुंबईत लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर, अवघ्या दोन महिन्यांत कचऱ्याचे प्रमाण आणखी अडीच हजार मेट्रिक टन एवढे कमी झाले. या काळात दररोज केवळ साडेचार हजार मेट्रिक टन कचरा मुंबईत जमा होत होता. मात्र, जून, २०२० नंतर पुनश्च हरिओम झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने हॉटेल्स, दुकान, बाजारपेठ फेरीवाले असे सर्व व्यवहार सुरू झाले आहेत. त्यामुळे कचऱ्याचे प्रमाण पुन्हा पूर्ववत झाले.  लॉकडाऊन काळात मुंबईतील सर्व रेस्टॉरंट, मंडई, पदपथावर व्यवसाय करणारे फेरीवाले बंद असल्याने दररोज तयार होणाऱ्या कचऱ्याच्या प्रमाणात १५ ते ३० टक्के एवढी घट झाली होती.  महापालिकेचे उपक्रम : ओला-सुका कचऱ्याचे वर्गीकरण, ओला कचऱ्यावर प्रक्रिया, कचऱ्यापासून वीज निर्मिती अशा उपक्रमांचा समावेश आहे, तसेच मालमत्ता करात सवलतीचे प्रोत्साहन दिल्यानंतर, गेल्या दोन वर्षांत मुंबईत दररोजचे कचऱ्याचे प्रमाण अडीच हजार मेट्रिक टनएवढे कमी करण्यात पालिकेला यश आले.  

टॅग्स :मुंबई