फडणवीसांनंतर एकनाथ खडसेही 'सिल्व्हर ओक'वर, मंत्री महोदयांचीही उपस्थिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 2, 2021 01:03 PM2021-06-02T13:03:11+5:302021-06-02T13:03:46+5:30
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे कुठेही दिसले नाहीत.
मुंबई - भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी दोन दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची मुंबईतील निवासस्थानी जाऊन भेट घेतली होती. त्यानंतर, ते जळगावमध्ये एकनाथ खडसेंच्या घरी गेले. तर, इकडे मुंबईत एकनाथ खडसें सिल्व्हर ओकवर पोहोचले आहेत. खडसे यांनी आज शरद पवार यांची निवासस्थानी जाऊन भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीसंदर्भात विचारपूस केली. मात्र, गेल्या 2 दिवसांतील भेटीगाठीची चांगलीच चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी खडसे यांच्या कोथळी येथील मुक्ताई सदन या निवासस्थानी खासदार रक्षा खडसे यांच्याकडे सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान माजी मंत्री एकनाथ खडसे कुठेही दिसले नाहीत. तिकडे खडसे सोमवारीच मुंबईला पोहोचले होते. मात्र, या भेटीवेळी एकनाथ खडसेंसोबतही फडणवीस यांचं बोलणं झाल्याचं रक्षा खडसे यांनी सांगितलं.
आज मुंबईत @NCPspeaks चे अध्यक्ष आणि देशाचे नेते आदरणीय श्री शरदरावजी पवार @PawarSpeaks साहेबांची सदिच्छा भेट घेतली. शास्त्रक्रियेपश्चात त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री ना. @samant_uday जी उपस्थित होते. pic.twitter.com/wTSgPug3jG
— Eknath Khadse (@EknathGKhadse) June 2, 2021
काही दिवसांपूर्वी शरद पवार यांच्यावर दोन शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. तेव्हापासून शरद पवार आपल्या निवासस्थानी आराम करत आहे. या काळात अनेक राजकीय पक्षांचे नेते शरद पवार यांना भेटून गेले आहेत. त्यामुळेच, आज एकनाथ खडसेंनीही पवारांची भेट घेतली. खडसेंसोबत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंतही याठिकाणी उपस्थित होते. ही केवळ सदिच्छा भेट असल्याचे खडसेंकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
फडणवीसांचं नाथाभाऊंशीही बोलणं झालं
'फडणवीस हे पहिल्यांदाच आमच्या घरी आले होते असं नाही. यापूर्वीही ते घरी आले आहेत. आमच्या कुटुंबीयांशी त्यांचे संबंध चांगले आहेत. राजकारण हे राजकारणाच्या जागी आहे. त्यामुळेच, नाथाभाऊंचंही त्यांच्याशी बोलणं झालं,' असं रक्षा खडसे म्हणाल्या. 'मी भाजपची खासदार आहे. माझ्या पक्षाचे नेते मतदारसंघात आल्यानंतर त्यांना घरी बोलवणं, चहापाण्यासाठी विचारणं माझं कर्तव्य आहे, ते मी केलं. यावेळी कार्यकर्त्यांच्याही भेटी झाल्या,' असं त्यांनी सांगितलं. कोथलीतील घरात असलेल्या कमळाच्या चिन्हाच्या घड्याळाबद्दल विचारलं असता, 'नाथाभाऊ आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत हे खरं आहे. पण, ते पूर्वी भाजपमध्ये होते, तेव्हापासूनच्या या वस्तू आहेत.', असं स्पष्टीकरण रक्षा खडसेंनी दिलं आहे.