पंधरा वर्षांच्या लढ्यानंतर कंपनीतील कामगारांना न्याय
By Admin | Published: March 20, 2015 12:22 AM2015-03-20T00:22:52+5:302015-03-20T00:22:52+5:30
तब्बल १५ वर्षे न्यायासाठी लढा दिल्यानंतर तळोजा येथील बामर लॉरी अॅण्ड कंपनी लिमिटेडमधील कामगारांना अखेर न्याय मिळाला.
नवी मुंबई : तब्बल १५ वर्षे न्यायासाठी लढा दिल्यानंतर तळोजा येथील बामर लॉरी अॅण्ड कंपनी लिमिटेडमधील कामगारांना अखेर न्याय मिळाला. एकूण ४८ कामगारांपैकी हयात असलेल्या आणि कंपनीत असलेल्या २५ कामगारांना कामावर पुन्हा रुजू करून घेण्याचे आदेश केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते आणि पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कंपनी प्रशासनाला दिले आहेत.
बामर लॉरी अॅण्ड कंपनी लिमिटेड या कंपनीने १५ वर्षांपूर्वी अचानक कामगारांच्या हातात नोटीस देऊन ही कंपनी बंद करत असल्याचे सांगितले होते. त्यामुळे कंपनीतील ४८ कामगारांसह त्यांच्या कुटुंबांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला होता, मात्र या कामगारांनी हार न मानता ते न्यायालयात गेले. त्याचबरोबर विविध मार्गांनी लढा सुरू ठेवला. पण आंदोलने, मोर्चे करूनही त्यांना यश मिळत नव्हते. दरम्यान, तीन वर्षांपूर्वी कंपनीने तळोजामध्येच ड्रम बनवण्याच्या प्लांटचे काम सुरू केले. हा प्रकल्प येत्या सहा महिन्यांत सुरू होणार आहे. त्यामुळे कामगारांमध्ये नवी आशा निर्माण झाली. नवी दिल्लीत झालेल्या बैठकीला कामगार प्रतिनिधी अनिल माने, विलास सोनी, प्रभाकर मेहेर आणि गणेश आंबोलकर, बामर कंपनीचे उपाध्यक्ष विजय बात्रा यांच्यासह पेट्रोलियम विभागाचे संचालक आणि सचिव यांच्यामध्ये बैठक झाली आणि सर्व कामगारांना पुन्हा रुजू करण्याचे आदेश देण्यात आले. (प्रतिनिधी)
च्नवीन प्लांट टाकल्यानंतर कंपनीने सेवापटलावर असलेल्या २५ कामगारांचा हक्क डावलून हंगामी तत्त्वावर नवीन कामगार भरती केल्याने कामगारांनी आपला लढा आणखी तीव्र केला. कामगारांनी याबाबत केंद्रीय अवजड उद्योगमंत्री आणि पेट्रोलियम मंत्री यांना व्यथा सांगितली. त्यानंतर मूळ कामगारांनाच सेवेत सामावून घेण्याचे आदेश देण्यात आले.