Join us  

Shivsena: 'त्या' थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील, शिंदे गटावर शिवसेनेचे जळजळीत वार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2022 7:43 AM

शिंदे गटाच्या मुखवट्यामागे बेईमान गेंड्याची कातडी म्हणत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 

मुंबई - शिवसेना आणि शिंदे गटातील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. निवडणूक आयोगाने शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह आणि शिवसेना नावही गोठवलं आहे. त्यामुळे, शिवसेनेला नव्या चिन्हासह पोटनिवडणूक लढवावी लागत आहे. त्यात, आयोगाकडून मशाल हे नवीन चिन्हही ठाकरेंच्या शिवसेनेला देण्यात आलं आहे. मात्र, प्रबोधनकार ठाकरेंनी दिलेलं नाव आणि दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची निशाणी धनुष्यबाण गोठविण्यात आल्याने शिवसेनेनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेनंच मुखपत्र असलेल्या सामनातून भाजप आणि शिंदे गटावर जबरी वार करण्यात आले आहेत. शिंदे गटाच्या मुखवट्यामागे बेईमान गेंड्याची कातडी म्हणत भाजपवर निशाणा साधण्यात आला आहे. 

शिवसेनेच्या सामना या मुखपत्रातून भाजप, शिंदे गट, एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्यावर शाब्दीक हल्ले चढविण्यात आले आहेत. मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवटय़ामागे भ्रष्ट, बेइमान गेंडय़ाची कातडी आहे. महाराष्ट्रीय जनतेने खोक्यांच्या चिता पेटविल्या की गेंडय़ाची कातडीही जळून जाईल . छे छे ! यांना जाळायचे कसे ? ही तर अफझल खान , औरंग्याच्या विचारांची अवलाद. महाराष्ट्राच्या दुष्मनांचे दफन करायला हवे . त्यांच्या थडग्यांवर फक्त एवढेच लिहायचे, ' येथे महाराष्ट्राच्या गद्दारांना स्वाभिमानी मराठी जनतेने कायमचे गाडले आहे !' त्या थडग्यावर तुमची नातवंडेही थुंकतील ! हे राज्य श्रींचे आहे . शिवरायांचे आहे . शिवसेना शिवरायांचा अंश आहे. तो अंश तुम्ही कसा मिटवणार ? अशा शब्दात शिंदे गटावर शिवसेनेच्या मुखपत्रातून टीका करण्यात आली आहे. 

अनेक मिंधे येतात-जातात, गद्दारांना इतिहासात स्थान नसते

 शिवसेना ही काही तुमच्या खोकेवाल्यांसारखी विकाऊ संघटना नाही. स्वाभिमानाच्या मजबूत पायावर ती 56 वर्षांपासून न डगमगता उभी आहे. अनेक वादळे आणि घाव झेलून तिने झंझावात कायम ठेवला आहे. शिवसेना संपवू अशी स्वप्ने पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचून शिवसेनेने अनेक अग्निपरीक्षा पार केल्या आहेत. शिवसेना हा एक चमत्कार आहे. ईश्वरी अवताराचा अंश आहे. भगवान शंकराने हलाहल प्राशन करताना एक थेंब पृथ्वीवर पडला. त्या थेंबातूनच जणू शिवसेनेचा अग्नी प्रकट झाला. त्यामुळे सर्व प्रकारचे हलाहल पचवून शिवसेना खंबीरपणे उभी आहे. ज्यांनी शिवसेना आणि धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार आहे. असे अनेक शिंदे व मिंधे येत-जात असतात. गद्दारांना इतिहासात कधीच स्थान नसते. पोवाडे मर्दांचे व स्वाभिमान्यांचे गायले जातात. खोकेबाज मिंध्यांवर लोक थुंकतात. 

शिवसेनेचं वस्त्र बदलेल, आत्मा तेच राहिल

भारतीय जनता पक्षाने शिवसेनेच्या बाबतीत त्यांची नीच खेळी केली. आता पुढे काय? सत्तेचा गैरवापर, पैशांचा मस्तवाल वापर करून तुम्ही जे केलेत ते शेवटचे टोक. त्या टोकावर आज शिवसेना आहे व भरारी घेण्यासाठी संपूर्ण आकाश मोकळे आहे. जणू शिवसेनेचा पुनर्जन्मच होताना आम्ही पाहत आहोत. चारशे वर्षांपूर्वी शिवरायांचा जन्म हा ईश्वरी अंश होता, ईश्वराचा पुनर्जन्म होता. त्या जन्माने महाराष्ट्राच्या दऱ्या, खोऱ्या, नद्या आनंदून गेल्या. जुलमी मोगलांविरुद्ध लढण्याचे नवे बळ मिळाले. मऱ्हाठा एकवटला. हिंदुत्व जागे झाले व भवानी तलवार मोगलांविरुद्ध तुटून पडली. त्या तलवारीने महाराष्ट्र दुश्मन व अनेक गारदी याच जमिनीत गाडले गेले. आज महाराष्ट्र पुन्हा त्याच वळणावर, त्याच परिस्थितीत उभा आहे. या परिस्थितीला शरण जाणार नाही, असे महाराष्ट्र दिल्लीकडे बघून गर्जत आहे. शिवसेनेचा आत्मा तोच राहील. रंगरूप तेच राहील. वस्त्र बदलेल. आत्मा कसा बदलेल? मिंधे गटाचा मुखवटा म्हणजे विचार नाही. मुखवटय़ामागे भ्रष्ट, बेइमान गेंडय़ाची कातडी आहे.  

टॅग्स :शिवसेनाउद्धव ठाकरेमुंबईएकनाथ शिंदे