गाझियाबाद पाठोपाठ मुंबईतही घरच्या बाथरूम आढळला दाम्पत्याचा मृतदेह; नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2023 11:41 AM2023-03-09T11:41:31+5:302023-03-09T11:42:35+5:30
पोलिसांच्या माहितीनुसार, शाह यांच्या घरी कामावर येणाऱ्या महिलेने घराचा दरवाजा वाजवला पण कुणीही दरवाजा उघडला नाही.
मुंबई - गीझर गॅस लीक झाल्यामुळे ४ जणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गाझियाबाद पाठोपाठ आता मुंबईतही एका दाम्पत्याचा मृत्यू झाल्याचं समोर आले आहे. याठिकाणी नवविवाहित जोडप्याचा बाथरूममध्ये संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळून आला. मुंबईतच्या घाटकोपर भागातील ही घटना आहे. गाझियाबाद आणि मुंबई या दोन्ही ठिकाणच्या घटनेचे कारण एकच असल्याचं बोलले जात आहे. पोलिसांनी जोडप्याचा मृतदेह पोस्टमोर्टमसाठी पाठवला असून रिपोर्टनंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होईल.
मुंबईतील घाटकोपर येथील दीपक शाह आणि टीना शाह हे कुकरेजा टॉवरमध्ये भाड्याने राहत होते. होळीच्या दिवशी घरातील बाथरूममध्ये लागलेल्या गीझरचा गॅस लीक झाल्यानंतर श्वास गुदमरल्यानंतर दोघांचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. हे दोन्ही मृतदेह राजावाडी रुग्णालयात पोस्टमोर्टमसाठी पाठवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार, शाह यांच्या घरी कामावर येणाऱ्या महिलेने घराचा दरवाजा वाजवला पण कुणीही दरवाजा उघडला नाही. त्यानंतर ही माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी डुप्लिकेट चावीने दरवाजा उघडला तेव्हा बाथरुममध्ये बेशुद्ध अवस्थेत दाम्पत्य आढळले. त्यांना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी नेले परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
का होते गीझर गॅसगळती?
थंडीच्या दिवसात नेहमी लोक गीझरचा वापर करतात. मागील काही दिवसांपासून गीझरमधून गॅस गळतीमुळे अनेकांचा मृत्यू झाल्याचं समोर आले. एक छोटी चूकही जीवघेणी ठरू शकते अशी अनेक उदाहरणे आहेत. जर बाथरूममध्ये व्हेंटिलेशन नसेल आणि जेव्हा तुम्ही गरम पाणी बादलीत भरत असाल तेव्हा बाथरुमचा दरवाजा खुला ठेवा. गीझर दोन प्रकारचे असतात एक ज्यात गॅस असतो आणि दुसरा विद्युत प्रवाहावर चालणारा. जर तुम्हीही घरात गीझर लावला असेल तर काळजी घ्या.
या गोष्टी लक्षात ठेवा
गॅस सिलेंडरनं चालणारा गीझर गॅस लीक झाल्यावर स्फोट होतो तर इलेक्ट्रिक गीझर खूप वेळ सुरू ठेवला तर त्यातील बॉयलर फुटण्याची शक्यता असते. गॅस गीझर कार्बन मोनोऑक्साईडने बनतो जर बाथरूममध्ये पुरेसा व्हेंटिलेशन नसेल तर माणसाचा जीव गुदमरु शकतो. तर इलेक्ट्रिक गीझर जास्त वेळ सुरू राहिला तर जास्त उष्णतेने लीकेज होण्याची शक्यता असते. गीझर जुना झाला असल्यास त्याची तपासणी करा, क्वाईल चेक करा.