Join us

दिल्लीला जात नाही, तोपर्यंत मीच मुख्यमंत्री - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2017 4:39 PM

शेतक-यांसाठी एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर कोणतं राज्य जिवंत राहिल हे दाखवूनच द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे

मुंबई, दि. 17 - शेतक-यांसाठी एवढी मोठी कर्जमाफी केल्यानंतर कोणतं राज्य जिवंत राहिल हे दाखवूनच द्यावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. भाजपा प्रदेश कार्यकारणीची बैठकीत बोलताना मुख्यमंत्र्यांनी हे वक्तव्य केलं असून अनेक मुद्द्यांवर सडेतोड मत व्यक्त करत विरोधकांवर जोरदार हल्ला केला आहे. यावेळी बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्वामीनाथन आयोग 2014 पासून पडून होता, मग भाजपा सत्तेत आल्यावरच तो आठवला असा प्रश्न विरोधकांना विचारला आहे. फक्त विरोधकच नाही तर विरोध करणा-या समित्यांनाही मुख्यमंत्र्यांनी टार्गेट केलं. जणू काही नरेंद्र मोदींनीच स्वामीनाथन आयोग आणला आहे, त्याप्रमाणे भाजपा सरकार आल्यावर स्वामीनाथन आयोगाची आठवण आली असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

आणखी वाचामहिला तस्करी हा मानवतेविरोधातील गुन्हाच - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसव्हिजिट महाराष्ट्रच्या लोगोचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण 

रावसाहेब दानवे यांच्या सततच्या वादग्रस्त विधानामुळे त्यांना मंत्रिमंडळातून नारळ देण्यात येईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दानवेंना प्रदेशाध्यक्ष पदावरुन हटवणार नाही असं सांगत दानवेंची गच्छंती केली जाणार असल्याच्या वृत्तांना पुर्णविराम दिला आहे. सोबतच आपण दिल्लीला जाण्याची तुर्तास शक्यता नसून, दिल्लीला जात नाही तोपर्यंत मीच मुख्यमंत्री असेन असं स्पष्ट केलं आहे. 

या देशात जर कोणी परिवर्तन घडवू शकतं, तर ते नरेंद्र मोदी घडवू शकतात असा लोकांना विश्वास आहे. भ्रष्टाचारानं बरबटलेली राजकीय व्यवस्था मोदींनी बदलली. विकसित भारतचं स्वप्न फक्त मोदीच पुर्ण करु शकतात. लोकांमध्ये विश्वास निर्माण केला तर भाजपाला कधीच पराभवाचं तोंड पहावं लागणार नाही असं देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. 

मुख्यमंत्र्यांनी विरोधकांच्या संघर्ष यात्रेवरही कडाडून टीका केली. एकही ठिकाणी हजार लोक जमा करु शकले नाहीत. त्यांचा संघर्ष एकमेकांसोबत होता. त्यांचेच प्रतिनिधी लोक आणण्यासाठी भांडत होते असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. आमचे नेते गोपीनाथ मुंडे यांनी संघर्ष यात्रा काढली होती. 1000 लोकसंख्या असलेल्या ठिकाणीही 900 लोक यात्रेत सहभागी असायचे अशी आठवण त्यांनी विरोधकांनी करुन दिली. 

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सुकाणू समितीवरही टीका केली. सुकाणू समितीतील काहीजण असे होते जे निवडणूक लढले तर डिपॉझिटही जप्त होईल असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. प्रश्न चर्चेने सुटतात यावर आम्हाला विश्वास आहे असं पुन्हा एकदा त्यांनी सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी प्रसारमध्यमांनाही टार्गेट करत टीका केली. 12 जणांनी आंदोलन केलं तरी बातमी केली जाते असं देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. 

बुलडाण्यात बंद मालगाडीपुढे उभं राहून रेल रोको आंदोलन करण्यात आलं असा दावाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला आहे. शेतक-याच्या सर्व समस्या सुटल्या नाहीत, पण हे सरकार प्रामाणिकपणे आमच्यासाठी प्रयत्न करत आहे यावर लोकांना विश्वास असल्याचं देवेंद्र फडणवीस बोलले आहेत. मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना यांनी खड्डे पाडले आणि भरायचं काम आम्ही करायचं असा टोला लगावला. कर्जमाफी केलीत तर मग 42,44 लाख शेतकरी पुन्हा कर्जात का गेले हे सांगा. शेतक-यांच्या अवस्थेसाठी कोण कारणीभूत कोण आहे याचं उत्तर दिलं पाहिजे असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. 

मुख्यमंत्र्यांनी विरोधी पक्षांवर टीका करताना यांनी खड्डे पाडले आणि भरायचं काम आम्ही करायचं असा टोला लगावला. कर्जमाफी केलीत तर मग 42,44 लाख शेतकरी पुन्हा कर्जात का गेले हे सांगा. शेतक-यांच्या अवस्थेसाठी कोण कारणीभूत कोण आहे याचं उत्तर दिलं पाहिजे असं आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना केलं. 

मुख्यमंत्र्यांनी यावेळी 15 ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी झेंडा फडकवू देणार नाही असं बोलणा-यांनाही धारेवर धरलं. भारताचा झेंडा फडकू देणार नाही असं म्हणणं देशद्रोह आहे. सत्ता गेली तरी चालेल पण झेंडा फडकवण्यापासून कोणी रोखू शकत नाही. अशा आंदोलनाच्या पाठिशी कोण आहेत हे पाहिलं पाहिजे. त्यांना अराजक पसरवायचा आहे. हे लोक म्हणजे चीनमध्ये पाऊस पडला की इकडे छत्री उघडणारे आहेत अशी सणसणीत टीका मुख्यमंत्र्यांनी केली आहे.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसभाजपा