ट्रेनमध्ये चौघांना गोळी घातल्यानंतर 'त्याने' बायकोला फोन केला; म्हणाला, मी स्वतःलाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2023 11:05 AM2023-10-22T11:05:39+5:302023-10-22T11:06:40+5:30
या घटनेनंतर चेतनसिंहने पहिला फोन त्याची पत्नी प्रियंका चौधरी हिला केला आणि आपण आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांना गोळी घातल्याचे सांगितले.
चालत्या ट्रेनमध्ये चार जणांची हत्या करणाऱ्या बडतर्फ आरपीएफ कॉन्स्टेबल विरोधात पोलिसांनी बोरिवली दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले आहे. चेतन सिंह चौधरी असे या आरोपी कॉन्स्टेबलचे नाव आहे. त्याने जयपूर मुंबई सेंट्रल एक्स्प्रेसने प्रवास करत असताना 31 जुलै 2023 रोजी आरपीएफचे सहाय्यक उपनिरीक्षक टिकाराम मीणा यांच्यासह चार जणांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली होती.
बोरिवली गव्हर्नमेंट रेल्वेपोलिसांनी (जीआरपी) शुक्रवारी न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार, जयपूर-मुंबई सेंट्रल सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये 31 जुलैला चार जणांना गोळ्या घालून ठार केल्यानंतर, माजी आरपीएफ कॉन्स्टेबल चेतनसिंह चौधरीने उत्तर प्रदेशातील आपल्या मामाला फोन लावला होता. तसेच, त्यांना टीव्हीवर आपल्यासंदर्भातील 'ब्रेकिंग न्यूज' बघायला सांगितले होते.
घटना घडली तेव्हा चेतनसिंह (33) याने सकाळी 4.30 वाजताच्या सुमारास उत्तर प्रदेशात राहणारे आपले मामा वासुदेव सिंह सोलंकी (46) यांना फोन केला होता, असे 1,029 पानांच्या संबंधित आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे. चौधरीचे त्याच्या मामांसोबत चांगले संबंध आहेत. त्याचे मामा ड्रायव्हर आहेत. चार जणांना गोळी घालण्यापूर्वी चेतनसिंह ने त्याच्या मामाला फोन लावला होता. मात्र त्यांच्या पत्नीने ते झोपले असल्याचे सांगितले होते.
हा कॉल करण्यापूर्वी चेतनसिंह याने त्याचे वरिष्ठ ASI टिकाराम मीना यांना, त्याची तब्येत बरी नसल्याने वलसाड अथवा वाशीमध्ये उतरू द्यावे अशी विनंती केली होती. मात्र त्याची ही विनंती नाकारण्यात आली आणि त्याला विश्रांती घेण्यास सांगण्यात आले. कारण काही तासांनंतर त्याची ड्युटीही संपणार होती, असे आरोपपत्रात म्हणण्यात आले आहे.
यानंतर काही वेळाने म्हणजेच, सकाळी 6.10 वाजताच्या सुमारास चेतनसिंह चौधरीने सोलंकी यांना पुन्हा फोन केला. यावेळी सोलंकी यांनी फोन उचलला. यावर आपण आपल्या रायफलने आपल्या वरिष्ठाला आणि तीन प्रवाशांना गोळ्या घालून ठार केल्याचे चौधरीने सांगितले. यासंदर्भात बोलताना सोलंकी यांनी सांगितले की, माझा त्याच्यावर विश्वासच बसला नाही. यानंतर चेतनसिंह चौधरीने त्यांना टीव्ही सुरू करून ‘ब्रेकिंग न्यूज’ बघायला सांगितले, असे जीआरपीच्या सूत्रांनी म्हटले आहे.
यानतंर, आता काय करावे काहीच सूचत नाही, असे चेनतनसिंहने त्याच्या मालाला विचारल. यावर सोलंकी यांनी त्याला पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितले होते. यानंतर सोलंकी यांनी टीव्ही सुरू करून चेतनसिंहची बातमी बघितली. तपास अधिकाऱ्यांनी चेतनसिंह चौधरी विरोधात दोन ठिकाणी द्वेषपूर्ण गुन्हे किंवा कलम १५३-ए नुसार गुन्हा दाखल केला होता.
‘‘मी स्वत:लाही गोळी घालून घेऊ का?’’
या घटनेनंतर चेतनसिंहने पहिला फोन त्याची पत्नी प्रियंका चौधरी हिला केला आणि आपण आपल्या वरिष्ठासह तीन प्रवाशांना गोळी घातल्याचे सांगितले. यानंतर, आपल्याकडून मोठी चूक झाली आहे. आता तू आपल्या दोन्ही मुलांचे चांगल्यापद्धतीने संगोपन कर आणि त्यांची काळजी घे, असेही तो म्हणाला. एवढेच नाही, तर "मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. जर तू म्हणशील तर, मी स्वतःवरही गोळी झाडायला हवी का?" असा सवाल करत, मला काहीच सुचत नाही, असे त्याने म्हटले होते. यावर, त्याची पत्नी प्रियंका हिने त्याला पोलिसांच्या स्वाधीन होण्यास सांगितले होते.