मुंबई : भारतीय हवामान शास्त्र विभागाच्या मंगळवारी आणि बुधवारी चुकलेल्या अंदाजानंतर गुरुवारी आलेल्या सरींनी विभागाची लाज राखली आहे. सातत्याने चुकणाऱ्या अंदाजामुळे हवामान विभागावर टीकेची झोड उठू लागली होती. मात्र मंगळवार व बुधवारी उकाड्यानंतर गुरुवारी मुंबईकरांनी सुखद सरींचा अनुभव घेतला.दरम्यान, मंगळवारी आणि बुधवारी उत्तर कोकणात मोडणाºया मुंबई शहर आणि उपनगरात बदलत्या हवामानामुळे कोरडे हवामान राहिले. त्यामुळे मुंबईकरांना प्रचंड उकाडा सहन करावा लागला. याउलट हवामान खात्याने गुरुवारपासून शनिवारपर्यंत काही ठिकाणी हलक्या सरी, तर काही ठिकाणी मुसळधारेचा इशारा दिला होता. त्यानुसार गुरुवारी शहरासह उपनगरात सरींवर सरी सुरू होत्या. परिणामी, हवामानातील उकाडा दूर होऊन वातावरणात गारवा आला होता.शहरात सकाळपासून सुरू असलेल्या हलक्या सरींनी दुपारी जोर पकडला. त्यामुळे तरुणाईने मोठ्या संख्येने नरिमन पॉइंटपासून गिरगाव चौपाटीपर्यंतचा समुद्रकिनारा व्यापला होता. उलट सकाळपासून दडी मारून बसलेल्या सरींनी पूर्व उपनगरावर दुपारी जोर धरला. मुलुंड, नाहूर, भांडुप, कांजूर, टागोरनगर, कन्नमवारनगर, घाटकोपर या भागात मुसळधार पावसाच्या सरी कोसळल्या. पूर्व द्रुतगती महामार्गावर पाऊस पडल्याने वाहनचालकांना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागले. पूर्व उपनगरात विश्रांती घेऊन पाऊस पडल्याने नागरिक सुखावले. जोरदार सरी ठरावीक वेळेने पडल्यामुळे मध्य रेल्वेवर पावसाचा परिणाम दिसून आला नाही.पश्चिम उपनगरातील बोरीवली, कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी ते वांद्रे येथे पावसाने गुरुवारी चांगलीच हजेरी लावली होती. पश्चिम दु्रतगती महामार्गावर पावसामुळे काही वेळासाठी वाहतूककोंडी निर्माण झाली होती. परंतु पावसाचा पश्चिम रेल्वेवर कोणताही परिणाम दिसून आला नाही. दरम्यान, जोरदार पाऊस पडल्यानंतरही पाणी साचल्याचे निदर्शनास आले नाही.
उकाड्यानंतर मुंबईत पावसाच्या जोरदार सरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 6:58 AM