उदघाटनानंतरही ठेकेदाराने लावले दवाखान्याला टाळे
By admin | Published: December 5, 2014 11:06 PM2014-12-05T23:06:44+5:302014-12-05T23:06:44+5:30
मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्राची मोडकळीत आलेली जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी ६३ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
टोकावडे : मुरबाड तालुक्यातील धसई प्राथमिक आरोग्य केंद्राची मोडकळीत आलेली जुनी इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन इमारत बांधण्यासाठी ६३ लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला.
या निधीतून या इमारतीचे बांधकाम काठेवाडी पद्धतीने करण्यात येऊन २६ आॅगस्ट रोजी याचे आ. किसन कथोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. परंतु, ठेकेदाराला कामाची रक्कम अद्याप न मिळाल्याने त्याने टाळे ठोकल्याने जुन्या मोडकळीस आलेल्या एका खोलीमध्ये रुग्णांवर उपचार व डिलिव्हरीचे पेशंट तपासले जात आहेत. या प्राथमिक आरोग्य केंद्रांवर ३० गावे, ४२ वाड्या, २० हजार लोकसंख्या अवलंबून आहे़
याबाबत तालुका आरोग्य अधिकारी सुनील बनसोडे यांनी सांगितले की, सुभाष कन्स्ट्रक्शनचे ठेकेदार शहाजी घोलप यांची रक्कम बाकी असल्याने त्यांनी इमारतीला टाळे लावले आहे.
घोलप यांनी सांगितले की, इमारतीच्या कामाच्या इस्टीमेटप्रमाणे ७ लाख व डिपॉझिटचे ४ लाख असे ११ लाख रुपये अद्याप मला मिळाले नसल्याने चावी दिलेली नाही. ६३ लाख खर्चूनदेखील नियोजनाअभावी इमारत पडून तर रुग्णांवर कोंबडीच्या खुराड्यात उपचार करावे लागत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. (वार्ताहर)