कंगना राणौतनंतर आता BMC चा मोर्चा सोनू सूदकडे; गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार

By प्रविण मरगळे | Published: January 7, 2021 10:15 AM2021-01-07T10:15:58+5:302021-01-07T10:18:01+5:30

सोनू सूदच्या या दर्यादिलीमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, याच काळात सोनू सूदच्या मदत कार्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले

After Kangana Ranaut, now BMC Demand take action against Sonu Sood by Police | कंगना राणौतनंतर आता BMC चा मोर्चा सोनू सूदकडे; गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार

कंगना राणौतनंतर आता BMC चा मोर्चा सोनू सूदकडे; गुन्हा नोंदवण्यासाठी पोलीस ठाण्यात तक्रार

Next
ठळक मुद्देमुंबई महापालिकेने ४ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात अभिनेता सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली आहे.लॉकडाऊन काळात गरीब मजुरांसाठी सोनू सूदने केले होते भरघोस मदतकार्य सोनू सूदला आर्थिक रसद भाजपाकडून मिळत असल्याचा काही राजकीय नेत्यांनी केला होता दावा

मुंबई – कोरोना काळात बॉलिवूड अभिनेता सोनू सूदने केलेल्या कामाची सर्वत्र चर्चा आहे, लॉकडाऊनमध्ये सोनू सूदने अनेक गरीब मजुरांना त्यांच्या इच्छित स्थळी पोहचवण्यासाठी मदत केली, कोणाचं ऑपरेशन असो, शिक्षणासाठी पैसे असतील प्रत्येक गोष्टीत मदत करण्यासाठी सोनू सूद आणि त्याची टीम पुढे सरसावली होती, ट्विटरवर समस्या मांडली आणि सोनू सूदला टॅग केलं की हमखास त्याच्या टीमकडून समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न झाले.

सोनू सूदच्या या दर्यादिलीमुळे त्याच्या चाहत्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली, याच काळात सोनू सूदच्या मदत कार्यावर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सोनू सूदला मिळणारी आर्थिक रसद ही भाजपाकडून होतेय असा दावाही काहींनी केला होता. शिवसेनेनेही सोनू सूदला या कामगिरीवर आक्षेप घेतले होते, त्यावरून भाजपानेशिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र सोडलं होतं. मात्र आता सोनू सूद वेगळ्या कारणासाठी चर्चेत आहे. अभिनेता सोनू सूद विरोधात मुंबई महापालिकेने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

मुंबई महापालिकेने सोनू सूदवर आरोप लावला आहे की, त्याने जुहू येथील ६ मजली रहिवासी इमारतीत कोणत्याही परवानगीशिवाय हॉटेल सुरू केलं आहे. त्यामुळे सोनू सूदवर महाराष्ट्र राज्य शहर नियोजन(MRTP) कायद्याखाली बेकायदेशीर बदल केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी बीएमसीने केली आहे. मात्र सोनू सूदने याबाबत नकार दिला आहे. आपल्याला बीएमसीकडून परवानगी मिळाली असून महाराष्ट्र कोस्टल झोन मॅनेजमेंटकडून परवानगी मिळणे बाकी आहे असं सोनू सूदने म्हटलं आहे.

मुंबई महापालिकेने ४ जानेवारी रोजी जुहू पोलीस ठाण्यात अभिनेता सोनू सूदविरोधात तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत म्हटलंय की, सोनू सूदने(Sonu Sood) जुहू येथील शक्ती सागर रहिवासी इमारत कोणत्याही परवानगीशिवाय तिचं हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे. या जागेवर बेकायदेशीरपणे बांधकामात बदल करण्यात आला आहे. प्राधिकरणाची परवानगी घेतल्याशिवाय अशाप्रकारे कोणतेही अनाधिकृत बदल करता येत नाहीत असं बीएमसीने(BMC) सांगितले आहे.

दरम्यान, सोनू सूदला बीएमसीने ऑक्टोबरमध्ये नोटीस पाठवली होती, या नोटिशीविरोधात त्याने स्थानिक कोर्टात धाव घेतली आहे. परंतु या प्रकरणात अद्याप दिलासा मिळाला नाही. कोर्टाने सोनू सूदला ३ आठवड्यांची मुदत हायकोर्टात जाण्याची दिली होती. ही मुदत संपली त्यानंतर बीएमसीने सोनू सूदविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

मात्र मी यापूर्वीच बीएमसीकडून योग्य ती परवानगी घेतली आहे. फक्त महाराष्ट्र कोस्टल झोन मेनेजमेंटच्या परवानगीचा विषय आहे. कोविड १९ च्या संकटामुळे ही परवानगी मिळण्यास उशीर झाला आहे. कोणतंही बेकायदेशीरपणे बांधकामात बदल झाला नाही, हे हॉटेल कोविड योद्धांना संकटकाळात राहण्यासाठी दिलं होतं. जर परवानगी नसेल तर मी पुन्हा हॉटेलचं रहिवाशी बांधकामात रूपांतर करतो, बीएमसीच्या तक्रारीविरोधात लवकरच मुंबई हायकोर्टात जाणार असल्याचं अभिनेता सोनू सूदने सांगितले.

Web Title: After Kangana Ranaut, now BMC Demand take action against Sonu Sood by Police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.