मुंबई- ऑस्कर विजेते निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर हॉलिवूडमधील २० पेक्षा जास्त अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप केला होता. या मुद्दयावर बोलताना हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिसा मिलानो हिनं माझ्यासोबतही असं घडलं आहे म्हणत #Me Too ट्विट केलं आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झालं. या कॅम्पेनला दुनियाभरातून महिलांचा सहभाग मिळतो आहे. या कॅम्पेनला आता मुंबई पोलिसांनीही पाठिंबा दिला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत या कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे. शारीरिक शोषणाबद्दल लोक ऑनलाइन मत मांडतं आहेत. ही चांगली सुरूवात आहे. आता या तक्रारींवर आम्हाला ऑफलाइन कायदेशीर करून अजून चांगली सुरूवात करू द्या. असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे.
मुंबई पोलिसांनी ट्विटर हॅण्डलवर एक फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये दोन मुली असून 'मी पोलिसांकडे तक्रार केली आहे', असं एक मुलगी बोलताना दिसते आहे. तर दुसरी मुलगी त्याला metoo असं उत्तर देते आहे. शारीरिक शोषणाबद्दल तुम्ही पोलिसांमध्ये तक्रार करा, असं सांगण्याचा प्रयत्न या फोटोतून करण्यात आला आहे. तसंच या फोटोवर #ReportSexualAbuse असा हॅशटॅग देण्यात आला आहे.
कोलकाता पोलिसांनीही दिला #MeToo कॅम्पेनला पाठिंबा
काही दिवसांपूर्वी कोलकाता पोलिसांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून कॅम्पेनला पाठिंबा दिला होता. कोलकाता पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लैंगिक शोषणाच्या विरोधात महिलांनी मजबूत व्हावं, असं म्हंटलं. तसंच या मुद्द्यावर पोलीस संतप्त असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं. लैंगिक शोषणाच्या प्रत्येक तक्रारावीर कठोर पाऊलं उचलणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हंटलं आहे. महिलांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असंही कोलकाता पोलिसांनी म्हंटलं.
काय आहे #Me Tooअभिनेत्री एलिसा मिलानो हिने शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य जगासमोर येण्यासाठी ट्विट केलं. 'आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक शोषण झालेल्या महिलांनी जर #Me Too लिहून स्टेटस शेअर केला, तर कदाचित स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव लोकांना होईल,' असे ट्विट तिने केलं आणि जगभरातील महिला याविषयी आपली मतं मांडू लागल्या.
भारतातही ट्रेडिंगया कॅम्पेनमध्ये हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव शेअर केले. भारतातही हा हॅशटॅग ट्रेंड झाला. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून भारतातील अनेक मुली आपल्याला आलेले असे वाईट अनुभव लोकांसमोर मांडले.